Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:54 IST2025-12-21T11:54:11+5:302025-12-21T11:54:57+5:30
Newasa Local Body Elections Results 2025 : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नगराध्यक्षपद राखले. तर शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी कामगार पक्षानेही ताकद दाखवली आहे.

Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
नेवासा नगर पंचायतीचा निकाल जाहीर झाला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला. १७ नगरसेवकांसाठी झालेल्या या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने तब्बल १० जागा जिंकल्या आहेत.
नेवासा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवक पदासह नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घटना घडली होती. ठाकरेंच्या शिवसेनेला दूर करत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले होते.
नेवासाचे नगराध्यक्ष कोण?
अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा ही एकमेव नगरपंचायत असून, शिंदेंच्या शिवसेनेने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. शिंदेंच्या शिवसेनेचे डॉ. करणसिंह घुले हे विजयी झाले आहेत.
१७ जागांपैकी १० जागा शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने जिंकल्या आहेत. महायुतीने ६ जागा जिंकल्या असून, १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत १८ हजार ७१२ पैकी १४ हजार ६०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल ७८.०६ टक्के मतदान झाले होते.
बोगस मतदानाचा घडला होता प्रकार
मतदानाच्या काळात काही प्रभागांमध्ये शाब्दिक वादविवाद झाले होते. प्रभाग क्रमांक १३/१ मध्ये एका तरुणाला बोगस मतदान करताना पकडण्यात आले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला होता.