मराठा आरक्षणाच्या मागणीला नवे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:34+5:302021-06-02T04:17:34+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात वेगवेगळी आंदोलने करणाऱ्या सर्व संघटनांना एका व्यासपीठावर येऊन सरकारवर दबाव आणावा, यासाठी ...

मराठा आरक्षणाच्या मागणीला नवे पाठबळ
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात वेगवेगळी आंदोलने करणाऱ्या सर्व संघटनांना एका व्यासपीठावर येऊन सरकारवर दबाव आणावा, यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मंगळवारी लोणी येथे मराठा समाजातील बहुतांशी संघटनांच्या उपस्थितीत आरक्षणासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भविष्यातील लढाईची रणनीती ठरविण्यासाठी उपस्थित प्रतिनिधींनी सूचना करून त्याची एकत्रितपणे ठोस कृती राज्य आणि जिल्हापातळीवर करण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
छावा संघटनेचे नानासाहेब जावळे म्हणाले, संघर्षाची नवी सुरुवात होत आहे. आजपर्यंत राज्यात मोर्चे निघाले कार्यकर्त्यांचे बळी गेले. आंदोलनाच्या केसेस कार्यकर्त्यांवर दाखल झाल्या; परंतु समाजाच्या हाती काहीच पडले नाही. विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आम्ही आलो असल्याचे छावा संघटनेचे नानासाहेब जावळे यांनी सांगितले.
बैठकीस समन्वयक महेश डोंगरे, अखिल भारतीय छावा संघटनेचे नानासाहेब जावळे (लातूर), शंभुराजे युवा क्रांतीचे संस्थापक सुनील नागने (तुळजापूर), भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके (मुंबई), भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब आहेर, शिवक्रांती सेनेचे संस्थापक संजय सावंत (बीड), संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ (जळगाव), शुभा संघटनेचे संस्थापक गणेश शिंदे (जालना), छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे (नांदेड), मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भीमराव मराठे (जळगाव), शिवसूर्या सामाजिक संघटनेचे संजय कदम (भुसावळ), हिंदवी सेनेचे बालाजी सूर्यवंशी (लातूर), मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायकराव भिसे (हिंगोली), शिव स्वराज्य संघटनेचे संदीप मुटकुळे (पंढरपूर), मराठा वॉरिअरचे विकास गुमसुळे (धुळे), शिवराज्य युवा संघटनेचे संजय करंडे (उस्मानाबाद), शिवसेनेचे पंकज इंगने, शिवबा संघटनेचे राजेंद्र जराड, धर्मवीर छत्रपती युवा संघटनेचे परमेश्वर रावत (बीड) यावेळी उपस्थित होते. विखे पाटील यांनीच आता समाजाची एकजूट घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी केली.
............................
अकोलेत बैठक
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी अगस्ती महाविद्यालयाच्या के.बी. दादा सभागृहामध्ये आमदार राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सुनील वाणी, नितीन दिनकर, जे.डी. आंबरे, सोनाली नाईकवाडी, जालिंदर वाकचौरे, कैलास वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, सीताराम भांगरे, यशवंत आभाळे, माधव तिटमे, सुरेश नवले, भाऊसाहेब गोडसे, बाळासाहेब वडजे, विजय सारडा, परशराम शेळके, वसंत मनकर, राजेंद्र गवांदे, रेश्मा गोडसे, आशा गोडसे उपस्थित होते.
..............
लोकप्रतिनिधींची मुंबईत घेणार बैठक
संगमनेर : मराठा आरक्षणासाठी आमदार विखे हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा दौरा करत बैठका घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी ते संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे म्हणाले, पहिल्या टप्प्यात पुढील दहा दिवसांमध्ये मराठा समाजाचे सर्व आमदार, खासदारांची बैठक मुंबईला बोलवावी. मराठा समाजाच्या सर्व संघटना यावेळी उपस्थित राहतील. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रमुख मागणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय लोणीतील बैठकीत झाला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नरेंद्र पाटील यांनीही निमंत्रित करण्यात येणार आहे, तसेच मराठा समाजातील सर्व मंत्री, आमदार, खासदार यांनी एकाच व्यासपीठावर आले पाहिजे. ही आजच्या बैठकीत प्रमुख भूमिका होती आणि त्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले आहे.
-----------------