सुपा विस्तारित एमआयडीसीला नवीन कारखान्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:49+5:302021-06-05T04:15:49+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा एमआयडीसी आता नवीन कारखान्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व रस्ते, वीज, ...

सुपा विस्तारित एमआयडीसीला नवीन कारखान्यांची प्रतीक्षा
सुपा : पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा एमआयडीसी आता नवीन कारखान्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गोष्टींची उपलब्धता करून देण्यात आली आहे. सध्याच्या कोरोना आपत्तीचा या नवीन उद्योगवाढीला फटका बसला आहे.
काही नवीन उद्योगासाठी एमआयडीसीकडून जागा देण्यात आली. परंतु, तेथे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोरोनाच्या पहिल्या व त्यापाठोपाठ आलेल्या दुसऱ्या टप्प्यामुळे उपलब्ध होणे कठीण झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. बांधकामासाठी लागणारे कारागीर व मजूर वर्ग हा बहुतांशी बाहेरच्या जिल्ह्यातील व राज्यातून येतो. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या भीतीने ही मंडळी गावाकडे गेली. त्याचा थेट परिणाम नवीन उद्योगांचे बांधकामच रखडल्याचे इच्छुक उद्योजकांनी सांगितले. कोरोनाच्या आगमनाने नव्याने येथे गुंतवणूक करून उद्योग उभारणीच्या विचारात असणाऱ्या उद्योजकांनी आपल्या निर्णयाला पुढे ढकलले आहे.
कोरोना आपत्तीचा कालावधी किती काळ राहील. लॉकडाऊन, संचारबंदी या सगळ्यांचा विचार करता केवळ जागा घेऊन गुंतवणूक करून उपयोग नाही. यात पुन्हा भविष्यात आणखी काय वाढून ठेवले आहे माहीत नाही. त्यापेक्षा काहीकाळ थांबलेले बरे राहील, असा विचार काही उद्योजक करत आहेत. विस्तारित एमआयडीसीमध्ये काही नवीन कारखान्यांची उभारणी होऊन त्यातील उत्पादन प्रक्रिया सुरू झाली, तर काही कारखान्यांचे बांधकाम झाले. पुढील उत्पादनासाठी येथील यंत्रसामुग्री आली, परंतु त्यांची कारखान्यात उत्पादनासाठी उभारणी करण्याचे काम थांबले. त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानांच्या आगमनाला कोरोनामुळे विलंब झाला. त्यांना परवानगी मिळण्यास होणाऱ्या चालढकलीमुळे यंत्रसामुग्रीची उभारणी रखडली. त्याचा परिणाम उत्पादन प्रक्रिया लांबली व त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या झालेल्या गुंतवणुकीचा त्यांना लाभ मिळत नाही. त्याचा परिणाम नव्याने येणाऱ्या उद्योगांवर व नवीन कारखानदारीवर होत असल्याचे बोलले जाते.
विस्तारित एमआयडीसीतील अधिग्रहण केलेल्या जागेवर रस्ता तयार झाला. वीज, मुळा जलाशयातून स्वतंत्र जलवाहिनी अशी कामे झाली आहेत, परंतु नवीन उद्योग नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात येथे रोजगार उपलब्ध झालेला नाही असे चित्र सध्या निर्माण झाले असले तरी दिवस बदलतील. कोरोनावर मात करण्यात यश येईल व एमआयडीसीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा या परिसरातील युवकांना आहे.
---
कोरोनामुळे मजूर मिळत नाही. त्यामुळे काही कारखान्यांच्या उभारणीला विलंब होत आहे. त्यांना देण्यात आलेल्या मुदतीत बांधकाम करता आले नाही. अशा कारखान्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. शासनाचे याबाबत परिपत्रक आले असून त्यानुसार संबंधितांना मुदतवाढ मिळेल.
-माणिक लोंढे,
एरिया मॅनेजर, एमआयडीसी
---
०४ सुपा एमआयडीसी
विस्तारित सुपा एमआयडीसीच्या अधिग्रहण केलेल्या जागेवर रस्ते, वीज, पाणी उपलब्ध करून दिले आहे.