अहमदनगर : महापालिकेच्या रक्तविघटन प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेले ७५ लाख रुपये अपुरे असल्याने मनपा फंडातून आणखी १५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. सीना नदीवर लोखंडी पुलाशेजारी नवीन पूल बांधण्याची निविदा समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली. सभापती गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा मंगळवारी झाली. नवनियुक्त आयुक्त दिलीप गावडे यांचे समितीच्यावतीने भोसले यांनी स्वागत केले. जिल्हा नियोजन समितीने रक्त विभागातील रक्तविघटन प्रयोगशाळेसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, त्यासाठी ९० लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. १५ लाख रुपयांचा निधी मनपा फंडातून देण्याला समितीने मान्यता दिली. मात्र, नव्याने खरेदी केलेले साहित्य व उपकरणे तशीच पडून न राहता तातडीने कार्यान्वीत करण्याचे निर्देश भोसले यांनी दिले. स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाशेजारी नवीन पूल बांधण्याच्या कामास समितीने मंजुरी दिली. दलित वस्ती निधीतून १ कोटी ८० लाख रुपये उपलब्ध आहेत. साडेसात कोटी रुपये पूल उभारणीकरीता लागणार आहेत. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे, त्याचा पुर्वानुभव पाहता पुलाचे काम अर्धवट राहणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना भोसले यांनी केली. (प्रतिनिधी)दोनशे कंटेनरची खरेदीजानेवारी महिन्यात दोनशे कंटेनर व दोन कॉम्पॅक्टर खरेदी करण्याला मंजुरी देऊन अजूनही ही खरेदी न झाल्याची नाराजी व्यक्त करून भोसले यांनी प्रशासनाने तत्काळ खुलासा करण्याचे प्रशासनाला बजावले. त्यावर दर करातील दुरुस्तीमुळे खरेदीस विलंब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आठवडाभरात ही खरेदी पूर्ण करण्याची सूचना भोसले यांनी दिली. तसे न झाल्यास पुढील सभेत प्रथम याच विषयाचा जाब प्रशासनाला द्यावा लागेल, असे त्यांनी बजावले. स्वस्तिक चौक व नेप्ती चौकाचे खासगीकरणातून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. नेप्ती चौकातील अर्धवट सर्कल तत्काळ काढण्याची सूचना भोसले यांनी केली.
सीना नदीवरील नवीन पुलाला मंजुरी
By admin | Updated: May 11, 2016 00:10 IST