शेतक-यांनी ठोकले नेवासा महावितरणच्या कार्यालयाला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:23 IST2017-12-20T18:22:41+5:302017-12-20T18:23:46+5:30
नेवासा तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने बुधवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वीय सहाय्यकांनी तसेच संतप्त शेतक-यांनी नेवासा येथील बसस्थानक जवळील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले.

शेतक-यांनी ठोकले नेवासा महावितरणच्या कार्यालयाला टाळे
नेवासा : तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने बुधवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वीय सहाय्यकांनी तसेच संतप्त शेतक-यांनी नेवासा येथील बसस्थानक जवळील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. वीज प्रश्नावर तालुक्यात आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सध्या रब्बी हंगाम सुरु असून ऐन पीक उभारणीच्या काळात महावितरणकडून शेतक-यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. नेवासा तालुक्यातील शेतक-यांना वेळेवर वीज बिले देण्यात आलेली नाहीत तसेच पूर्व सूचना न देता अचानकपणे सब स्टेशनमधून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून २०० ते २५० रोहित्र बंद करण्यात आली आहेत. काही ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही़ त्यामुळे महावितरण विरोधात नाराजीचा सूर आहे. यावेळी आमदार मुरकुटे यांचे स्वीयसहायक बाळासाहेब क्षीरसागर, महेश निपुंगे, शेतकरी रामेश्वर चावरे, अशोक शिंदे, बाळासाहेब शिंदे, राजू शिंदे, लक्ष्मण शिंदे, भाऊराव नागरे, पोपट शेकडे, दत्ता निकम, रमेश गवांदे, किरण खाटीक, दत्तात्रय मते, प्रकाश धनवटे आदी शेतकरी उपस्थित होते.