निसर्गप्रेमींनी केले ३६ जखमी पक्ष्यांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:17+5:302021-02-05T06:42:17+5:30

अहमदनगर : जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या पुढाकाराने १ जानेवारी ते ३० जानेवारी या कालखंडात ...

Nature lovers treated 36 injured birds | निसर्गप्रेमींनी केले ३६ जखमी पक्ष्यांवर उपचार

निसर्गप्रेमींनी केले ३६ जखमी पक्ष्यांवर उपचार

अहमदनगर : जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या पुढाकाराने १ जानेवारी ते ३० जानेवारी या कालखंडात मांजात अडकून जखमी झालेल्या जिल्हाभरातील ३६ पक्ष्यांवर यशस्वी उपचार करून त्यांना निसर्गात मुक्त करण्यात टीमच्या सदस्यांना यश आले. तसेच पाच पक्षी उपचारापूर्वीच मृत झाल्याची माहिती संघटनेचे प्रमुख जयराम सातपुते यांनी दिली.

संक्रांत सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर संक्रांत येते ती पक्षीजीवनावर. स्वत:साठी व आपल्या पिलांसाठी अन्नाच्या शोधात बाहेर पडलेले असंख्य पक्षी या महिनाभरात नायलाॅन मांजामुळे घायाळ होऊन मृत्युमुखी पडतात अथवा जखमी होतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी निसर्गप्रेमींच्या बर्ड हेल्पलाइन या उपक्रमामध्ये अनेक नवीन निसर्गप्रेमी जोडले जात आहेत. तसेच नागरिकांमध्येही पक्षांबद्दल संवेदनशीलता व जागृती वाढत आहे. दरवर्षी नगर जिल्ह्यात निसर्गप्रेमींच्या प्रयत्नाने संक्रांत काळात व पुढेही वर्षभर बर्ड हेल्पलाइनद्वारे जखमी पक्षांवर उपचार केले जातात.

--

१८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे जखमी पक्षांबाबत नागरिकांमध्ये जागृती वाढू लागली आहे. यावर्षी अनेक नव्या युवकांनी स्वयंस्फूर्तीने जखमी पक्षांना आमच्यापर्यंत झटपट हस्तांतरित केले. त्यामुळे अनेक पक्षांवर वेळेवर उपचार होऊन त्यांचे प्राण वाचू शकले. या कार्यात मोलाचे योगदान दिलेल्या सर्वांना संस्थेतर्फे अभिनंदन प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे.

-जयराम सातपुते, पक्षी अभ्यासक

------------

दुर्मीळ असलेले पक्षी वाचले

दुर्मीळ असलेले चट्टेरी वनघुबड, घार, बगळे, शिक्रा, कापशी घार, शिंजीर, साळुंकी, कावळा, कोकीळ, भारव्दाज, होला, पिंगळा घुबड, पोपट, चिमणी अशा अन्नसाखळीतील महत्त्वाच्या स्तरांवरील अनेक प्रकारच्या पक्ष्यांना वाचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले. झाडांमध्ये अडकलेल्या मांजामुळे संक्रांतीनंतरही पक्षी त्यात अडकल्याच्या घटना घडत आहेत. आपल्या घर परिसरातील हे धागे बांबूने काढून टाकण्याचे आवाहनही निसर्गप्रेमी समूहातर्फे करण्यात आले आहे.

--

फोटो- ०२ बर्ड

Web Title: Nature lovers treated 36 injured birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.