संशोधनातूनच देशाची प्रगती शक्य
By Admin | Updated: August 23, 2014 00:43 IST2014-08-22T23:35:21+5:302014-08-23T00:43:18+5:30
बाभळेश्वर : युवकांच्या संशोधनाच्या माध्यमातूनच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला.

संशोधनातूनच देशाची प्रगती शक्य
बाभळेश्वर : देशापुढे अनेक आव्हाने आहेत़ अशा परिस्थितीत देशातील युवकांच्या संशोधनाच्या माध्यमातूनच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला.
येथील पद्मश्री विखेपाटील महाविद्यालय आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी डॉ. गाडे बोलत होते़ ते म्हणाले, आपला देश आजही ऊर्जा, अन्नधान्य, माहिती व तंत्रज्ञान याबाबतीत अजूनही समाधानकारक प्रगती करू शकला नाही़ परंतु या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांच्या सहभागातून असे दिसते की, आपण निश्चितच जागतिक पातळीवर संशोधनाच्या माध्यमातून प्रगतीपथावर जाऊ शकतो़ मूलभूत विज्ञानातील पायाभूत संशोधनाशिवाय देशाचा विकास अशक्य असल्याचेही डॉ़ गाडे म्हणाले़
जर्मनी येथील संशोधक डॉ. कार्लोस मचाडो म्हणाले, अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमधून जागतिक पातळीवरील संशोधकांच्या संशोधनाला चालना मिळते़ तसेच एकमेकांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण करुन जागतिक दर्जाचे संशोधन सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते़ लोणीसारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयाने ही आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन मोठे यश संपादन केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़ एस़ एऩ पठाण म्हणाले, युवा संशोधकांनी वैज्ञानिक क्षेत्रात अधिकाधिक सखोल ज्ञान संपादन करुन देशातील मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहावे, असा संदेश दिला़
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी तीन दिवस चाललेल्या या परिषदेचा आढावा घेताना सांगितले की, महाविद्यालयाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वीपणे पार पाडली. या परिषदेमध्ये विविध देशातील संशोधक अभ्यासकांनी सहभागी होऊन महाविद्यालयाच्या प्रयत्नांना यशस्वी केले़ महाविद्यालय सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, अॅड़ अप्पासाहेब दिघे, सहसचिव डॉ़ जे़ आऱ भोर, डॉ़ पी़ जी़ रेड्डी, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य मतकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्राचार्य उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक डॉ. अनिल कुऱ्हे यांनी परिषदेचा गोषवारा घेतला. डॉ़ अनिल वाबळे, प्रा़ संगीता धिमते, प्रा़ वैशाली मुरादे यांनी सूत्रसंचालन केले़ प्रा़ दत्तात्रय थोरात यांनी आभार मानले़ (वार्ताहर)