नाथ संमेलनाने मढी भक्तिमय
By Admin | Updated: September 10, 2016 00:23 IST2016-09-10T00:21:51+5:302016-09-10T00:23:34+5:30
शुक्रवारी श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी)चा गर्भगिरी परिसर पहिल्या नाथ संमेलनामुळे भक्तीमय झाला.

नाथ संमेलनाने मढी भक्तिमय
पाथर्डी/तिसगाव : महाभिषेक, महाआरती, होमहवन, टाळमृदंगाच्या गजरातील ग्रंथदिंडीची ग्रामप्रदक्षिणा, नाथांच्या महतीला उजाळा देणारे लेखकांचे प्रबोधन अशा वातावरणाने शुक्रवारी श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी)चा गर्भगिरी परिसर पहिल्या नाथ संमेलनामुळे भक्तीमय झाला.
उद्घाटनप्रसंगी स्वामी स्वरुपानंद सरस्वती, राष्ट्रसंत रमाकांत व्यास, डॉ. विलासनाथ महाराज, रमेशगिरी महाराज, उमकांत खंडेश्वर, देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज आदी संतांची मांदियाळी होती.
यावेळी स्वामी स्वरुपानंद म्हणाले, नाथपंथियांची वृद्धी होण्यास गर्भगिरी पर्वत रांगाच्या निसर्गरम्य परिसराचे अभूतपूर्व योगदान आहे. वारकरी संप्रदायाचे ठसे प्रथम याच परिसरात उमटले. सोनई ते यावलवाडीच्या ११० किलोमीटरच्या गर्भगिरी पट्ट्यात नवनाथांच्याच किर्तीचा दरवळ आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात याच भूमीत नाथ संमेलन उपस्थितीचा सोहळा अनुभवणे हा दुर्मिळ योगायोग आहे. नाथ परंपरेचे अधिष्ठान, किर्ती परंपरा व जीवन जगण्याची प्रणाली आत्मसात केल्यास परिसराची सर्वांगीण वृद्धी सहज होईल.
तीन पिढ्यांनी कधीही न अनुभवलेला हा नाथ संमेलन सोहळा आहे. नाथांच्या मूक हुंकाराचा प्रतिध्वनी नाथ संमेलनाच्या आयोजनातून सत्यत्वास आला आहे, असे सांगत भास्करगिरी महाराज यांनी नाथपंथीय हटयोग ध्यान धारणेबाबत माहिती दिली. श्रद्धा असल्यास दगडी मूर्तीतदेखील सजीवतेचा जागृती अनुभव येऊ शकतो. याचा अभ्यास नाथ ग्रंथ, पुराणाद्वारे ध्वनित होतो. विद्वावानांनी सांगितलेल्या शब्दोचारण परिणामापेक्षा साधू संत महंताच्या अनुभवी देहबोलीची साद अंत:करणाला सुखावून परिणाम साधते, असे रमाकांत व्यास म्हणाले.
दुपारच्या सत्रात महेंद्रनाथ महाराज, प्रा. अशोक नेवासकर, प्रा. टी. एन. परदेशी, प्रा. अरविंद गोरेगावकर यांनी नाथसंप्रदाय, महती व अवतार कार्य याबाबत पौराणिक स्मृतींना उजाळा दिला. शिवतेज विद्यालयाचा मुला मुलींनी सादर केलेले स्वागतगीत कौतुकांचा विषय ठरले.
धर्मादाय उपायुक्त हिराबाई शेळके, सरपंच रखमाबाई मरकड, विश्वस्त ज्योती मरकड, जि.प. सदस्या योगिता राजळे, देवस्थानचे उपाध्यक्ष सुनील सानप, मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, विश्वस्त मधुकर साळवे, डॉ. माणिक सारूक, सुधीर मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, वृध्देश्वरचे कार्यकारी संचालक जालिंदर पवार, उपाध्यक्ष रामकिसन काकडे आदी हजर होते.
देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी स्वागत केले. कोषाध्यक्ष दत्तात्रय मरकड यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त मिलिंद चवंडके यांनी आभार मानले.