नाहाटांची गटविकास अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:19+5:302021-06-22T04:15:19+5:30
श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथच्या (ता.श्रीगोंदा) सरपंचावर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविल्याच्या रागातून गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार ...

नाहाटांची गटविकास अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमबाजी
श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथच्या (ता.श्रीगोंदा) सरपंचावर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविल्याच्या रागातून गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी शिवीगाळ, दमबाजी केली. त्यांनी काळे यांच्या वाहनाच्या दिशेने बूट भिरकावला. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास श्रीगोंदा पंचायत समितीच्या आवारात घडली. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब नाहाटा यांच्या विरोधात ३५३, १८६, २९४ या भादंवि कलमांखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीतील विकास कामात गैरव्यवहार, अनियमितता असल्याची तक्रारी लोणी व्यंकनाथ येथील नागरिकांनी केल्या होत्या. पंचायत समितीकडून या तक्रारींची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी काम करणे, वर्क ऑर्डर नसताना कामे करून बिल काढणे, अशा अनियमितता चौकशी अहवालात आढळून आल्या. या चौकशीच्या आधारे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला. हे समजताच
बाळासाहेब नाहाटा हे सोमवारी पंचायत समितीत आले. तुम्ही राजकीय आकसातून लोणी व्यंकनाथचा सरपंच अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठविला का? असे बाळासाहेब नाहाटा गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना म्हणाले. त्यानंतर काळे यांनी नाहाटा यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत तुम्ही जिल्हा परिषदेकडे अपील करू शकता. मी चौकशी अहवालानुसार कारवाई केली आहे. त्यावर नाहाटा यांनी काळे यांना उद्देशून तुझा जीवच घेतो, तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतो, असे धमकावले. नाहाटांनी यावेळी शिवीगाळही केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. काळे हे वाहनात बसत असताना नाहाटांनी त्यांच्या वाहनाच्या दिशेने बूट भिरकावला.
या प्रकारानंतर गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तहसीलदार प्रदीप पवार यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले.
---वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली
ही घटना घडल्यानंतर प्रशांत काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना संपर्क केला. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस पोलीस प्रमुख मनोज पाटील यांचे याकडे लक्ष वेधले. पाटील यांनीही श्रीगोंदा पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी गुन्हा दाखल करून बाळासाहेब नाहाटा यांना अटक केली.