उसाला ३१०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत नगर-मनमाड महामार्ग रोखला; शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 13:07 IST2017-11-16T13:05:52+5:302017-11-16T13:07:28+5:30
शेवगाव तालुक्यातील ऊस दरावरुन पेटलेले आंदोलन ताजे असतानाच आता राहुरी तालुक्यातही उसाला ३१०० भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

उसाला ३१०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत नगर-मनमाड महामार्ग रोखला; शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील ऊस दरावरुन पेटलेले आंदोलन ताजे असतानाच आता राहुरी तालुक्यातही उसाला ३१०० भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतक-यांनी इतर वाहने सोडून फक्त उसाच्या ट्रक अडविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २०० उसाच्या ट्रक अडविण्यात आल्या आहेत.
राहुरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे़ या भागातून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यांना जातो़ मात्र, कारखान्यांकडून अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुरुवारी सकाळी राहुरीजवळील गुहा येथे नगर-मनमाड महामार्गावर शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले. यात शेकडो शेतक-यांनी सहभाग घेत उसाच्या ट्रक अडविण्यास प्रारंभ केला. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, सतिष पवार, दिनेश वराळे, अरुण डौले , प्रमोद पवार, दिनेश देठे, सुनिल इंगळे, सचिन पपवळे, आनंद वने, प्रविण पवार, विशाल तारडे, अच्युत बोरकर आदींनी सहभाग घेतला़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ऊस दराच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिका-यांशी सर्व कारखानादारांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देत वाघ यांनी रास्ता रोको मागे घेण्याची विनंती आंदोलकांना केली. मात्र, आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले.