नगरचा ढोल ‘नाद’ राज्याबाहेर घुमणार!
By Admin | Updated: September 12, 2016 23:12 IST2016-09-12T23:08:42+5:302016-09-12T23:12:07+5:30
सुदाम देशमुख, अहमदनगर कला-संस्कृतीचा ध्यास घेतलेल्या तरुणाईने पारंपरिक वाद्यांची जपवणूक करीत नगर शहरात ढोल वादनातही नवी रसिकता तयार केली आहे.

नगरचा ढोल ‘नाद’ राज्याबाहेर घुमणार!
सुदाम देशमुख, अहमदनगर
कला-संस्कृतीचा ध्यास घेतलेल्या तरुणाईने पारंपरिक वाद्यांची जपवणूक करीत नगर शहरात ढोल वादनातही नवी रसिकता तयार केली आहे. कलेचे उपासक बनलेल्या तरुणाईने एकापेक्षा अनेक दर्जेदार ढोलपथक स्थापन करून कलाविष्काराला नवे वळण दिले आहे. गणपतीवरील श्रद्धा आणि केवळ हौसेपोटी तरुण या कलाप्रकाराकडे वळाले आहेत. रसिकांची दाद हीच कमाई असे मानणाऱ्या नगरच्या ढोलपथकाचा नाद प्रथमच राज्याबाहेर म्हणजे हैदराबाद येथील विसर्जन मिरवणुकीत घुमणार आहे.
मुंबई-पुण्याचा ढोल नगरमध्ये पाच-सहा वर्षांपूर्वी आला. सुरवातीला काही तरुणांनी ढोल वादनाचा प्रयोग केला आणि बघता बघता त्याला मोठे स्वरुप प्राप्त झाले. ऱ्हीदम हे नगरचे पहिले ढोलपथक! दहा-बारा तरुणांनी सुरू केलेल्या या पथकाच्या सदस्यांची संख्या आता ९० ते १०० पर्यंत पोहोचली आहे. केवळ गणपती विसर्जन मिरवणूक किंवा गणेशोत्सवामध्येच ही पथके वादन करतात.
ऱ्हीदम पथकाच्या ढोलवादनाचा व्हीडिओ, माहिती फेसबुकवर अपलोड केली. त्यावेळी त्याला परराज्यातूनही लाईक मिळाल्या. हैदराबाद येथून ऱ्हीदमला मागणी आली. तेथील गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीमध्ये पाचारण केले आहे. यामुळे नगरचे ढोलवादन प्रथमच राज्याबाहेर होणार आहे.
नगरमध्ये ऱ्हीदम, रुद्रवंश,तालयोगी, रुद्रनाद अशी ढोलवादन करणारी प्रसिद्ध पथके आहेत. याशिवाय जगदंबा ढोल पथक (बोल्हेगाव), कपिलेश्वर गणेश मंडळाचे स्वतंत्र ढोलपथक तयार करण्यात आले आहे. वर्षभर शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग करणारे तरुण केवळ हौसेपोटी या पथकामध्ये येतात आणि जीव ओतून ढोल वाजवितात. सहा वर्षे वयापासून ते ५० वर्षे वयापर्यंतचे पुरुष आणि महिला ढोल वादन करून आपला कलाविष्कार घडवितात.
रोजगार नव्हे केवळ हौस
एका तासाला २५ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत ढोल वादनासाठी घेतले जातात. एका पथकात शंभर ते दोनशे तरुण सहभागी होतात. ५०च्या वर ढोल आणि ३० ते ४० ताशे आणि २० ते २५ ध्वज असा पथकाचा पसारा असतो. वाहतूक, चहा-नाश्ता-भोजन, गणवेश, ढोल-ताशांची देखभाल-दुरुस्ती यासाठी लागणारा सर्व खर्च मिळालेल्या पैशांमधून करावा लागतो. त्यामुळे ढोल वाजविणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जात नाही. केवळ हौसेखातर हे सर्व केले जाते, असे सर्वच ढोल पथकांच्या प्रमुखांनी सांगितले. रसिकांची दाद हीच आमची कमाई आहे. त्या बळावरच दरवर्षी दोन ते सहा महिन्यांपासून सराव करण्यात येतो.
आमच्या पथकात २२७ सदस्य आहेत. त्यापैकी १०० मुले तर ६० मुली आहेत. यावर्षी प्रथमच हैदराबादला जाणार आहोत. कमाई हा उद्देश नसून केवळ हौसेखातर कलाअविष्कार घडविल्याचा अपार आनंद तरुणांना असतो. खर्चातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून समाजपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. मंडळांकडून घेतलेल्या पैशातून ढोल वादनाच्या काळात सदस्यांचा चहा-नाश्ता, जेवण, पाण्याच्या बाटल्या, ढोलचे पान बसविण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे मानधन देण्यासाठी काहीच शिल्लक नसते. यंदा सलग दहा दिवस पथकाचे वादन झाले.
-अवधूत गुरव, रुद्रनाद.
संस्कृती आणि समाजाचे निखळ मनोरंजन करण्यासाठी नगरमध्ये पहिले ढोल पथक स्थापन करण्याचा मान आहे. केवळ गणेशोत्सवाच्या काळातच ढोलवादन केले जाते. राळेगणसिद्धी येथील वादन कार्यक्रम स्मरणीय होता. दरवर्षी वादनासाठी नवे ताल आणि चाल बसविली जाते. नवरात्रौत्सवामध्येही वादन केले जाते. गेल्या चार वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीमध्ये वादन करतो.पथकात ९० ते १०० सदस्य असून ५० ढोल व १२ ताशे आहेत. नवे ताल देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो.
- राहुल शेलार, ऱ्हीदम
हलगीचा ताल प्रथमच ढोल वादनामध्ये समाविष्ट केला. त्याला रसिकांची चांगली पसंती मिळाली. यंदा मानाच्या नऊ क्रमांकाच्या मंडळात वादन केले जाणार आहे. यंदाचे दुसरे वर्ष आहे. २२५ तरुण, ९५ ढोल, २२ ताशे, ११ ध्वज पथकात आहेत. देशी तालावर भर असून नवे ताल देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. यंदा सात ताल नव्याने बसविण्यात आले आहेत.
- प्रशांत मुनफन, रुद्रवंश