नगर-दौंड रस्ता, साकळाई पाणी योजना वर्षानुवर्षे प्रलंबित
By Admin | Updated: August 19, 2014 23:32 IST2014-08-19T23:25:26+5:302014-08-19T23:32:45+5:30
श्रीगोंदा : कुकडी घोडचे पाटपाणी आणि साखर कारखानदारीमुळे दुष्काळग्रस्त तालुक्याचे चित्र बदलले आहे.

नगर-दौंड रस्ता, साकळाई पाणी योजना वर्षानुवर्षे प्रलंबित
श्रीगोंदा : कुकडी घोडचे पाटपाणी आणि साखर कारखानदारीमुळे दुष्काळग्रस्त तालुक्याचे चित्र बदलले आहे. श्रीगोंद्याचे १२ टक्के सिंचन असलेले क्षेत्र ७० टक्क्यांच्या वर गेले. मात्र एम. आय. डी. सी. प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रोजगार व व्यवसायाला चालना मिळाली नाही. साकळाईचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. कोळगाव, मांडवगण, गुणवडीचा पठारी भाग विकासापासून उपेक्षित राहिला आहे.
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील वाळकी व चिचोंडी पाटील हे गट समाविष्ट आहेत. श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठा पणाला लावून रस्ते, बंधारे, सभामंडप आदी कामासाठी कोट्यवधीचा निधी आणला. परंतु ठेकेदारांनी निकृष्ट कामे करून निधीची लयलूट केली. विकास कामापेक्षा कामात झालेला भ्रष्टाचार यावर चर्चेची गुऱ्हाळे रंगली.
कुकडी प्रकल्पात डिंबे-माणिकडोह बोगदा व डिंबे-येडगाव कालवा विस्तारीकरण यावर घोषणा झाल्या. पुणेकरांनी पाणी प्रश्नाबाबत आडमुठे राजकारण केले. यावर लोकप्रतिनिधींनी त्यांना पाहिजे त्यावेळी धारेवर धरले नाही. घोडची उंची वाढविण्यावर चर्चा झाली. पाणी प्रश्नांवरील जखमांच्या वेदना कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सहन कराव्या लागल्या आहेत.
कोळगाव व गुणवडी, मांडवगण परिसरातील ३६ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेवर ठोस कार्यवाही झाली नाही. श्रीगोंदा व काष्टीला भेडसावणारा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आ. बबनराव पाचपुतेंनी घोड धरणावरून नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली कामाचा नारळ फोडला.
नगर-दौंड रस्त्याचा प्रश्न गेल्या तीन वर्षापासून चर्चेत आहे. तांत्रिक अडचणीमुळे शासन पैसे देत नाही आणि ठेकेदाराला निविदा परवडत नाही.
भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नावर आ. पाचपुते यांना कोंडीत धरले. परंतु खा. गांधी यांनीही कोणतीच कृती केली नाही. खा. गांधी यांनी या प्रश्नात लक्ष घालून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. या रस्त्याचा प्रश्नमार्गी लागला तर या भागाच्या विकासाला चालना मिळेल.
१९८० पासून गाजत असलेल्या एम. आय. डी. सी. ने औटीवाडी, कोळगाव फाटा, वाळकी असा प्रवास केला आहे. मात्र एम. आय. डी. सी. च्या घोषणा हवेतच विरल्या गेल्या आहेत.श्रीगोंदा तालुक्यातील ४८ गावातील सुमारे ५ हजार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर माळढोक पक्षी अभयारण्य जमीन आरक्षणाचे भूत बसले आहे. ते भूत कधी हटणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी सर्वच नेत्यांनी तत्व, निष्ठा गुंडाळून ठेवत मिळेल तो झेंडा हातात घेऊन मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. हे नेते विकास व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भूमिका घेणार का हाच प्रश्न आहे. (प्रतिनिधी)