नगर बाजार समिती निवडणुकीचा दिवाळीत उडणार बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST2021-06-18T04:15:25+5:302021-06-18T04:15:25+5:30
केडगाव : नगर बाजार समितीची मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत संपत असून त्यापूर्वी निवडणुका घेण्यासाठी मतदार याद्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. ...

नगर बाजार समिती निवडणुकीचा दिवाळीत उडणार बार
केडगाव : नगर बाजार समितीची मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत संपत असून त्यापूर्वी निवडणुका घेण्यासाठी मतदार याद्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. ऐन दिवाळीत निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट गंभीर असल्यास निवडणुकीला मुदतवाढ मिळणार असल्याचे शासकीय सूत्रांकडून समजले.
स्व. दादा पाटील शेळके नगर बाजार समिती जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने या समितीच्या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व असते. १३ नोव्हेंबर २०१६ रोजी मागील निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. मात्र बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ३ डिसेंबर रोजी संपत आहे. यापूर्वी निवडणुका घेण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याने ऐन दिवाळीतच बाजार समितीच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.
तथापि, सध्या कोरोना संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे मागील वर्षी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचे संकट काहीसे टळण्यानेच तालुक्यात तब्बल ५९ ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यंदा दुसरी लाट भयानक होती. तालुक्यातच जवळपास सव्वाचारशे जणांचा यात जीव गेला. तालुक्यात आतापर्यंत १५ हजार जण कोरोना बाधित झाले. यामुळे निवडणुकांचे भवितव्य कोरोना संसर्गावर अवलंबून आहे. तिसरी लाट किती गंभीर आहे. यावर नगर बाजार समितीच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.
मात्र असे असले तरी बाजार समितीच्या प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून बाजार समिती प्रशासनाने मतदार याद्याची जुळवाजुळव सुरू केली असून तालुका उपनिबंधकांना पत्र पाठवून सेवा संस्था मतदारांची नावे कळविण्याचे पत्र दिले आहे.
---
कोणात होणार निवडणूक
नगर बाजार समितीत गेल्या १५ वर्षांपासून कर्डिले-कोतकर-जगताप यांच्या गटाची सत्ता आहे. महाविकास आघाडीने दिवंगत नेते दादा पाटील शेळके व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली आव्हान दिले होते. गेल्या १५ वर्षांपासून शेळके-गाडे यांची आघाडी मोठे आव्हान उभे करते. मात्र त्यात यश आले नाही. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत गाडे-शेळके यांच्या आघाडीला एकतर्फी विजय मिळतो. मात्र फक्त बाजार समितीत त्यांना पराभव पत्करावा लागतो. यावेळीही महाविकास आघाडी विरोधात सत्ताधारी असा सामना रंगणार अशी चिन्हे आहेत.
--- मागील निवडणुकीची परिस्थिती
एकूण जागा : १८, मतदार : ४३३६, ग्रामपंचायत- ९९७, सेवा संस्था -१३८१, व्यापारी-२५५१, हमाल मापाडी-४०७, सर्व जागांवर- कर्डिले-कोतकर-जगताप गट विजयी.
----
अशी असेल संचालक विभागणी..
सेवा संस्था-११, ग्रामपंचायत- ४, व्यापारी- २, हमाल मापाडी -१.
---
राज्य सरकारने कोरोना परिस्थितीमुळे ३१ ऑगस्टपर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली आहे. या कालावधीत कोणत्याच निवडणुकांची काहीच कार्यवाही होणार नाही. त्यानंतर कोरोनाची स्थिती पाहून राज्य सरकार निवडणुका घेण्याचे धोरण जाहीर करील. त्यावर नगर बाजार समितीच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल.
-के. आर. रत्नाळे,
तालुका उपनिबंधक, सहकार