संगमनेरमध्ये माय-लेकराचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:27 IST2018-07-31T11:27:33+5:302018-07-31T11:27:47+5:30

गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने आई व चिमुकला विहिरीत फेकला गेल्याने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला

Myanmar Lake drowned in Sangamner | संगमनेरमध्ये माय-लेकराचा विहिरीत बुडून मृत्यू

संगमनेरमध्ये माय-लेकराचा विहिरीत बुडून मृत्यू

संगमनेर : गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने आई व चिमुकला विहिरीत फेकला गेल्याने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेल्याने बचावली. ही घटना रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात घडली. प्रियांका महेश देशमुख (वय २२) व सोहम महेश देशमुख (वय २) अशी मृत माय-लेकराची नावे आहेत.
अकोले तालुक्यातील विरगाव येथून प्रियांका देशमुख या दुचाकीहून मुलगा सोहम व सासू छाया देशमुख यांना घेऊन जवळे कडलग येथील त्यांच्या घराकडे निघाल्या होत्या. रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या जवळे कडलग गावाच्या शिवारात आल्या असता गणोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरून त्यांच्या ताब्यातील दुचाकी घसरली. दुचाकीवर मागे बसलेल्या छाया देशमुख या रस्त्याच्या बाजूने फेकल्या गेल्याने बचावल्या, तर प्रियांका व सोहम देशमुख हे दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत फेकले गेले. त्यात पंधरा ते वीस फूट खोल पाणी असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या माय-लेकरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Myanmar Lake drowned in Sangamner