कंपन्यांकडून सोयाबीनच्या बियाणाची परस्पर विक्री?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:26+5:302021-07-26T04:20:26+5:30
टाकळीभान : सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजल्याने दर्जेदार बियाण्याचा ...

कंपन्यांकडून सोयाबीनच्या बियाणाची परस्पर विक्री?
टाकळीभान : सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजल्याने दर्जेदार बियाण्याचा तुटवडा होता. बियाणांची उगवण क्षमतेची अडचण लक्षात घेत बियाणे तयार करणाऱ्या नामवंत कंपन्यांनी सोयाबीनचे बियाणे व्यापाऱ्यांना, ऑईल मिल मालकांना परस्पर विकून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भावाने बियाणे विकत घ्यावे लागले.
श्रीरामपूर तालुक्यात बियाणे खरेदी करताना आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. चढ्या भावाने बियाणे विकत घ्यावे लागले. अनुदानावर मिळणारे बियाणेही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाले. त्यासाठीच्या ऑनलाइन नोंदणीतही मोठा गोंधळ उडाला. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियाच माहीत नाही. उपलब्ध बियाणेच शेतकऱ्यांनी पेरले. जून महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्याचाही विपरित परिणाम पेरणी झालेल्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर झाला. अनेक भागात उशिरा झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पेरण्या लांबल्या. अनेक शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. त्यासाठी बियाणे पाहताना पुन्हा शेतकऱ्यांना मोठी ससेहोलपट करावी लागली. दुबार पेरणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव परिसरात धाव घेतली. तिकडेही शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक झाली. नफेखोर व्यापारी आणि अनेक कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांची बियाणांसाठी पद्धतशीर कोंडी केली.
मागील वर्षीच्या अनुभवामुळे नामवंत कंपन्यांनी सीड प्लॉटचे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच ऑइल मिल मालकांना परस्पर विकून टाकले. या खेरीज अनेक मोठ्या कृषी विक्रेत्यांना आपल्याकडील बियाणांचा साठा तसाच ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बियाण्यात होणाऱ्या फसवेगिरी विरोधातील शेतकऱ्यांमधील जागरूकता आणि शेतकरी संघटनांचा वाढता दबावमुळे संबंधित बियाणे कंपन्यांना असे पाऊल उचलावे लागल्याची चर्चा आहे.
............
महाबीज दरवर्षी राज्यात ६ ते ६.५ लाख क्विंटल बियाणे उत्पादन करते. यावर्षी केवळ २ ते २.५ लाख क्विंटल बियाणांचे उत्पादन शक्य झाले. अतिवृष्टीमुळे बियाणांच्या गुणवत्तेत २० टक्के घट आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी २८ ते ३० हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली जाते. मागील वर्षी १०२ कंपन्यांच्या बियाणांबाबत तक्रारी झाल्या होत्या. या वर्षी अजून तक्रारी आलेल्या नाहीत.
- रवींद्र जोशी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज
...................
अनुदानावर उपलब्ध होणारे बियाणे यंदा श्रीरामपूर तालुक्यातील ५२ शेतकऱ्यांना ऑनलाइन सोडत पद्धतीने देण्यात आले आहे.
-अशोक साळी, तालुका कृषी अधिकारी, श्रीरामपूर