वरिष्ठांसमोर मुरकुटेंच्या लीला मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:59+5:302021-07-28T04:22:59+5:30
नेवासा : नेवासा तालुक्यात भाजपची अवस्था अतिशय बिकट झालेली असून पक्षाला पूर्णपणे मरगळ आलेली आहे. या भागात भाजप वाढविण्यासाठी ...

वरिष्ठांसमोर मुरकुटेंच्या लीला मांडणार
नेवासा : नेवासा तालुक्यात भाजपची अवस्था अतिशय बिकट झालेली असून पक्षाला पूर्णपणे मरगळ आलेली आहे. या भागात भाजप वाढविण्यासाठी कष्ट करणारे कार्यकर्ते हवालदिल झालेले आहेत. २०१४ ते १९ या काळात भाजपचे लोकप्रतिनिधी असतानाही तालुक्यात पक्षाची पीछेहाट होणे अपमानास्पद आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पक्ष संघटन वाढविणे तर दूरच, परंतु जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद न देता केवळ नातेवाईकांना सक्षम करण्याची कार्यपद्धती राबविली. त्यामुळे पक्ष वाढीला खीळ बसली. त्याशिवाय मुरकुटे यांच्या इतर लीला ही वरिष्ठ नेत्यांसमोर मांडणार आहे, असे अनिल ताके यांनी म्हटले आहे.
तालुका भाजपाने शनिवारी ताके यांच्या निलंबनाचे पत्रक काढले. त्यानंतर ताके यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्यावर टीका केली. ताके म्हणाले, मुळा सहकारी साखर कारखाना, शनी शिंगणापूर देवस्थान निवड, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, नेवासा व नगरपंचायत निवडणुकीसह तालुक्यातील काही महत्वपूर्ण ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी आमदार मुरकुटे यांनी बोटचेपी व तडजोडीची भूमिका घेतल्या. त्यामुळेच तालुक्यात पक्षाचे संघटनात्मक मोठे नुकसान झाले. मुरकुटे यांच्यामुळेच या भागात पक्ष खिळखिळा झाला असल्याचे आपण पक्ष श्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिल्याने मुरकुटेंनी आपल्यासह दिनकर गर्जे व पोपट जिरे यांच्यासह नामधारी तालुकाध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवीत निलंबनाची कारवाई केलेली आहे. या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे अपील करून म्हणणे मांडणार असल्याचे ताके यांनी स्पष्ट केले.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे यांचा कुकाणा जिल्हा परिषद गटातून पराभव करण्यासाठी त्यावेळी मुरकुटे यांनी अंधारात राष्ट्रवादी उमेदवाराशी हात मिळवणी करून गर्जे यांना पराभूत केले. घोडेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसर्डा यांनी सरपंच पदासाठी उभा केलेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मुरकुटेंनी विरोधकांशी तडजोडीची भूमिका घेतली. एकंदरीत मुरकुटे यांनी भाजपची ताकद कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी आमच्यावर कारवाई केल्याचे ताके यांनी सांगितले.