विसापूर येथे मनोरुग्ण महिलेची हत्या
By | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:54+5:302020-12-07T04:14:54+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेची गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. लता मधुकर ...

विसापूर येथे मनोरुग्ण महिलेची हत्या
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेची गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हत्या केली.
लता मधुकर शिंदे (रा. विसापूर), असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला बऱ्याच दिवसांपासून विसापूर येथे होती. शुक्रवारी सकाळी विसापूर व पिंपळगाव पिसा सीमेवर रमेश भिकाजी पंदरकर यांच्या तुटून गेलेल्या उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला. ही हत्या गुरुवारी रात्री झाली असावा, असा अंदाज आहे. तिच्या मानेवर जखम झालेली होती.
मनोरुग्ण असल्याने तिची हत्या होण्यामागचे नेमके काय कारण असावे याचा नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व बेलवंडी पोलीस शोध घेत आहेत. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, बाळू मधुकर शिंदे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे पुढील तपास करीत आहेत.