अपघातात मनपा कर्मचारी ठार

By Admin | Updated: July 3, 2014 00:58 IST2014-07-03T00:34:52+5:302014-07-03T00:58:54+5:30

अहमदनगर : महापालिकेचे कर्मचारी ब्रिजलाल चंद्रकांत बिज्जा यांना एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Municipal staff killed in accident | अपघातात मनपा कर्मचारी ठार

अपघातात मनपा कर्मचारी ठार

अहमदनगर : शहरात टपाल वाटप करून परत येत असलेले महापालिकेचे कर्मचारी ब्रिजलाल चंद्रकांत बिज्जा (वय ५०, रा. तोफखाना, विठ्ठल मंदिराजवळ) यांना एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील डीएसपी चौकाजवळील पेट्रोलपंपासमोर हा अपघात घडला. अपघातानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केला.
महापालिकेत सामान्य प्रशासन विभागात बिज्जा हे गेल्या २५ वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होते. मनपातील टपाल वाटपाचे ते काम करतात. त्यासाठी ते रोज सायकलवरून प्रवास करीत होते. टपाल वाटप करून ते बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास महापालिकेकडे येत होते. याचवेळी पाठीमागून वेगात येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या सायकलला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यावेळी पाऊस सुरू असल्याने मदत मिळण्यास उशिर झाला. अ‍ॅब्युलन्सलही उशिरा आली. घटना घडल्यानंतर महापालिकेतील कर्मचारी रस्त्यावर उतरले. त्यांनी रास्ता रोको करून पोलीस प्रशासन, वाहतूक शाखेचा निषेध केला. या आंदोलनात महापौर संग्राम जगताप,कामगार युनियनचे नेते अनंत लोखंडे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक, प्रभारी आयुक्त भालचंद्र बेहरे, संजीव परशरामी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे, अशोक ढेकणे,वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी हजर झाले. प्रांताधिकारी वामन कदम यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी आंदोलन करणार आहेत. गुरुवारी (दि.३) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शोकसभा होणार आहे. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी यांनाही सभेसाठी बोलविण्यात आले आहे. महापालिकेसमोरून जड वाहतूक बंद करावी, अशी मनपा कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे. जड वाहनांना बंदी केली नाही तर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान मयताचे भाऊ अशोक चंद्रकांत बिज्जा (रा. तोफखाना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक क्रमांक एम.एच.-१६, बी- ९३२७ या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चिटमपल्ली तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पॅगोने हूल दिल्याने अपघात
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापौर, आयुक्त, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना निवेदने दिली आहेत. यात म्हटले आहे की, मनपा कर्मचारी बिज्जा यांना पॅगो रिक्षा चालकाने हूल दिल्याने पॅगो व ट्रक यांच्यामध्ये सापडून अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले़ पॅगो रिक्षास नंबर प्लेट नव्हती.
मनपा कार्यालयासमोर रस्ता क्रॉस करतेवेळी कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. मे महिन्यामध्ये आनंदा देठे डीएसपी चौकात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला़ अन्य एक कर्मचारी साहेबराव गायकवाड हे जखमी झाले होते. वाहतूक नियंत्रीत करावी, असे मागणी निवेदनात केली आहे़

Web Title: Municipal staff killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.