लोणावळा येथील उद्योजकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून नगर पोलिसांनी केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 20:55 IST2018-04-15T20:50:18+5:302018-04-15T20:55:07+5:30
लोणावळा येथून अपहरण झालेल्या उद्योजकाची कोतवाली पोलिसांनी नगरमध्ये चौघांच्या तावडीतून सुटका केली. यावेळी एका आरोपीस ताब्यात घेतले़. अंधाराचा फायदा घेत तिघे फरार झाले. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड चौकात हा थरार रंगला.

लोणावळा येथील उद्योजकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून नगर पोलिसांनी केली सुटका
अहमदनगर : लोणावळा येथून अपहरण झालेल्या उद्योजकाची कोतवाली पोलिसांनी नगरमध्ये चौघांच्या तावडीतून सुटका केली. यावेळी एका आरोपीस ताब्यात घेतले़. अंधाराचा फायदा घेत तिघे फरार झाले. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड चौकात हा थरार रंगला.
दाऊ सऊ मरगळे (वय २३ रा़ पवनानगर, ता़ मावळ, जि़ पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. मरगळे याच्या मेहुण्यासह त्याच्या दोन साथीदारांनी १३ एप्रिल रोजी लोणावळा येथून उद्योजक दिनेशकुमार रामेश्वर शर्मा (वय ५१ रा़ अंधेरी भवन, मुंबई) यांचे अपहरण केले. अपहरणकर्ते शर्मा यांना होंडा सिटी कारमध्ये घेऊन चाळीसगाव येथे निघाले होते. रविवारी पहाटे पुणे रोडवरून ते शहरातील मार्केटयार्ड चौकात आले़. यावेळी चहा पिण्यासाठी त्यांनी कार थांबविली़ कारमधून तिघे जण खाली उतरले आणि जवळच्या टपरीवर निघून गेले़ याचवेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अण्णा बर्डे हे मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बंदोबस्ताला होते. कार थांबल्यानंतर बर्डे यांना संशय आला. बर्डे यांचे कारकडे लक्ष होते़ याचवेळी कारमधून अपहरण झालेले शर्मा हे बर्डे यांच्या दिशेने धावत आले आणि त्याने सांगितले, की ‘माझे चौघांनी अपहरण केले आहे’ बर्डे यांनी प्रसंगवधान राखत कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले़ यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस नाईक लोंढे, होमगार्ड उमाप यांनी उर्वरित तिघांचा पाठलाग केला. मात्र ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी कारमधून तीन चाकू व एक चॉपर जप्त केले आहे. शर्मा यांचे अपहरण झाल्यानंतर लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी उद्योजक शर्मा यांच्यासह ताब्यात घेतलेल्या आरोपीला लोणावळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, सहायक अधीक्षक अक्षय शिंदे, निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मोठ्या बंधूऐवजी दिनेशकुमार यांचेच अपहरण
दाऊ मरगळे व त्याच्या साथीदारांना लोणावळा येथून दिनेशकुमार शर्मा यांच्या मोठ्या बंधूचे अपहरण करावयाचे होते. मात्र चुकून त्यांनी दिनेशकुमार यांचे अपहरण केले. शर्मा यांना चाळीसगावला घेऊन जात असतानाच या अपहरण प्रकरणाचा भांडाफोड झाला.