मनपा आयुक्तांनी मागविला बोरगेंच्या कारवाईचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:42+5:302021-06-04T04:17:42+5:30
अहमदनगर : महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी ...

मनपा आयुक्तांनी मागविला बोरगेंच्या कारवाईचा प्रस्ताव
अहमदनगर : महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी सामान्य प्रशासनाला गुरुवारी दिला. तसेच रेमडेसिविर प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावत बोरगे यांनी आयुक्तांना खुलासा केला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत वैद्यकीय आरोग्य अधिकारी बोरगे यांनी दालनात वाढदिवस साजरा केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी आयुक्त गोरे यांनी बोरगे यांना शनिवारी नोटीस बजावली होती. बोरगे यांना २४ तासात खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र बोरगे यांनी मुदतीत खुलासा सादर केला नाही. याबाबत आयुक्त गोरे यांनी फोनवरून विचारणा केली असता खुलासा सादर केला आहे,असे बोरगे यांनी आयुक्तांना सांगितले. प्रत्यक्षात मात्र बोरगे यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत खुलासा सादर केला नव्हता. गुरुवारी सायंकाळी बोरगे खुलासा घेऊन आयुक्तांकडे आले होते. परंतु, आयुक्त गोरे यांनी त्यांचा खुलासा स्वीकारला नाही. तसेच बोरगे यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश त्यांनी सामान्य प्रशासनाला दिला. सामान्य प्रशासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बोरगे यांच्यावर कारवाई केली जाईल, असे गोरे यांनी सांगितले.
याशिवाय रेमडेसिविर प्रकरणी चौकशीसाठी पोलिसात हजर होण्याचा आदेश बोरगे यांना देण्यात आला होता. मात्र बोरगे चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले नव्हते. गुरुवारी चौकशीसाठी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हजर होत बोरगे यांनी खुलासा सादर केला. तसे पत्र बोरगे यांनी आयुक्तांना सादर केले असून, त्यावर आयुक्त काय भूमिका घेतात, यावरच पुढील चौकशी अवलंबून असणार आहे.
....
रेमडेसिविर प्रकरणी बोरगे यांनी काय केला खुलासा
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या खुलाशाची प्रत लोकमतच्या हाती लागली आहे. यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग विभागातील कर्मचारी योगेश औटी यांच्या सांगण्यावरून संदीप वाळूंज याने फोनवरून रेमडेसिविर इंजेक्शन आहेत, असे सांगितले. त्याने ते इंजेक्शन संबंधित हॉस्पिटलमध्ये जमा केलेले आहेत. पण, हे इंजेक्शन घेऊन माझ्या दालनात का आला होता, हे मला सांगता येत नाही. मी दालनात असताना सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते तिथे आले. सातपुते व औटी यांच्यात काही तरी बोलणे सुरू होते, ते मला माहीत नाही. कार्यालयीन वेळ संपल्याने मी कार्यालयातून निघून आलो, असे बोरगे यांनी खुलाशात नमूद केले आहे.
...
- वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे नोटिसीचा खुलासा घेऊन आले होते. परंतु, त्यांना दिलेली मुदत संपलेली असल्याने त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश सामान्य प्रशासनाला देण्यात आला आहे. याशिवाय मागील रेमडेसिविर प्रकरणात ते चौकशीसाठी गेले होते. त्यांनी लेखी खुलासा सादर केला असून, तसे पत्र महापालिकेला दिले आहे.
- शंकर गोरे, आयुक्त, मनपा