‘मल्टीस्टेट’ दर्जा कायम
By Admin | Updated: August 23, 2014 00:43 IST2014-08-22T23:33:53+5:302014-08-23T00:43:25+5:30
अहमदनगर : नगर अर्बन बँकेला मिळालेला मल्टीस्टेटचा दर्जा बेकायदेशीर असल्याचा दावा औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल

‘मल्टीस्टेट’ दर्जा कायम
अहमदनगर : नगर अर्बन बँकेला मिळालेला मल्टीस्टेटचा दर्जा बेकायदेशीर असल्याचा दावा करीत बँकेचा मल्टीस्टेट दर्जा रद्द करण्याची मागणी करणारी काही मोजक्या सभासद व विरोधी संचालकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी (दि़२२) फेटाळून लावली़ खंडपीठाच्या या निर्णयामुळे बँकेचा मल्टीस्टेटचा दर्जा कायम राहिला असून, संचालक मंडळ निवडणुकीचा मार्गही मोकळा झाला आहे़ दरम्यान खंडपीठाचा हा निर्णय नगरमध्ये समजताच बँकेच्या सर्व शाखांमध्ये फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला़
नगर अर्बन बँकेला गतवर्षी केंद्रीय निबंधकांनी मल्टीस्टेट दर्जा दिला होता़ यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र गांधी व माजी अध्यक्ष अॅड़ अशोक कोठारी यांनी त्यास न्यायालयात आव्हान दिले होते़ बँकेचा मल्टीस्टेटचा दर्जा रद्द करावा, सहकारी संस्थांचे मल्टीस्टेटमध्ये रुपांतर करण्यासाठी न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे जारी करावेत तसेच बँकेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात जारी केलेले आदेश रद्द करावेत, अशा आशयाच्या खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या़ या याचिकेवर खंडपीठात सुनावणी होवून त्या फेटाळण्यात आल्या़ बँकेच्या विरोधातील याचिका फेटाळल्याचे वृत्त समजताच बँकेच्या सर्व शाखांमध्ये आनंद साजरा करून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले़ (प्रतिनिधी)
योग्य न्याय
अर्बन बँकेच्या हिताचा निर्णय घेऊन बँकेस मल्टीस्टेटचा दर्जा प्राप्त करून दिला आहे़ मात्र, काही मोजक्या लोकांना हे रूचले नाही़ त्यामुळे त्यांनी बँकेच्या विरोधात याचिका दाखल केली़ मात्र, विजय हा सत्याचाच होतो़ न्यायालयाने बँकेच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून न्याय दिला आहे़ सत्ताधारी संचालकांच्या पाठिंब्यामुळे सर्व अडचणींवर मात करता आली़
- खा़ दिलीप गांधी, अध्यक्ष, नगर अर्बन बँक