रोहित्रांच्या कामांची जबाबदारी महावितरणचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:29+5:302021-09-17T04:26:29+5:30

'वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरीच करतात आटापिटा' अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले होते. त्यावर महावितरण कंपनीकडून खुलासा करण्यात ...

MSEDCL is responsible for Rohitra's work | रोहित्रांच्या कामांची जबाबदारी महावितरणचीच

रोहित्रांच्या कामांची जबाबदारी महावितरणचीच

'वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरीच करतात आटापिटा' अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले होते. त्यावर महावितरण कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे. नादुरुस्त रोहित्र बदलताना बिघाडाच्या यादीप्रमाणे क्रमवारीनुसार दुरुस्ती करून एजन्सीमार्फत लावण्यात येते. त्याच्या वाहतुकीची जबाबदारीदेखील महावितरण कंपनीची असते. त्यामुळे कृषिपंपधारक शेतकऱ्यांना रोहित्र नादुरुस्त झाल्यास स्वतः वाहतूक अथवा दुरुस्त करण्याची गरज नाही. विद्युत यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करून रोहित्रांची वाहतूक किंवा दुरुस्ती करत असल्यास ती बाब अवैध आहे. त्यामुळे विद्युत अपघात होऊन जीवित हानी सुद्धा होऊ शकते. तरी यापुढे रोहित्रांमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ महावितरणला कळवावे, तसेच याबाबत महावितरण यंत्रणेशी अनधिकृतरित्या हस्तक्षेप, गैरप्रकार अथवा गैरव्यवहार करीत असल्याचे आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी. त्यामुळे महावितरणला योग्य ती कार्यवाही व कारवाई करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी इतर व्यक्तींशी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये. आपले कृषिपंपाचे वीजबिल वेळेत भरून सहकार्य करावे. त्यामुळे अधिक गतिमान सेवा देण्यास मदत होईल, असे कार्यकारी अभियंता यांनी म्हटले आहे.

-------

Web Title: MSEDCL is responsible for Rohitra's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.