एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:10+5:302021-07-07T04:27:10+5:30
चंद्रकांत शेळके अहमदनगर : राज्य लोकसेवा आयोगाकडून रखडलेली पदभरती, ज्या काही परीक्षा झाल्या त्याचा विलंबाने लागत असलेला निकाल, प्रलंबित ...

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : राज्य लोकसेवा आयोगाकडून रखडलेली पदभरती, ज्या काही परीक्षा झाल्या त्याचा विलंबाने लागत असलेला निकाल, प्रलंबित असलेल्या मुलाखती, नवीन परीक्षांच्या जाहीर होत नसलेल्या तारखा यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुरते गोंधळात सापडले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून पुणे येथे स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर एमपीएससी विद्यार्थ्याच्या नोकरीचा प्रश्न पुढे आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. परंतु दोन वर्षांपासून ही पदभरती रखडलेली आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकऱ्यांची मुले मोठी स्वप्ने घेऊन एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. कोरोना काळात आर्थिक स्थिती ढासळलेली असतानाही पालक मुलांना पैसे पुरवतात. परंतु परीक्षांचा गोंधळ असल्याने मुलांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
-------------
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?
शासनाने क्लासेसला परवानगी न दिल्याने स्पर्धा परीक्षेचे क्लासही सध्या ऑनलाइन सुरू आहेत. गेल्या दीड वर्षापासून हेच सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. ऑनलाइन क्लासमधून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे शासनाने काही अटी-शर्ती घालून ऑफलाइन क्लासला परवानगी देण्याची मागणी होत आहे.
---------
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले!
मागील वर्षी जून २०२०मध्ये राज्यातील ४१३ विद्यार्थी वेगवेगळ्या पदांसाठी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु त्यांना अद्यापही नियुक्त्या नाहीत. यात ४०हून अधिक उपजिल्हाधिकारी पदाचे उमेदवार आहेत. ते आज उत्तीर्ण होऊनही बेकार आहेत.
- रामदास दौंड, विद्यार्थी
----------------
नोव्हेंबर २०१९ला राज्य अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा झाली. त्याची मुलाखत अद्याप झालेली नाही. मार्च २०२० मध्ये अभियांत्रिकीची पूर्वपरीक्षा झाली, मात्र अद्याप त्याची मुख्य परीक्षा झालेली नाही. याशिवाय आरटीओ, वन संरक्षक अशा परीक्षा होऊनही निकाल लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल होत आहेत. यूपीएससीसारखे काटेकोर नियोजन राज्य लोकसेवा आयोगाने करण्याची गरज आहे. परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांचे वय निघून चालले आहे.
- हेमंत आभाळे, विद्यार्थी
------------
कोरोनामुळे ऑनलाइन क्लास घ्यावे लागतात. परंतु यात अनेक त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यास मर्यादा येतात. अनेक वर्षांपासून पदभरती नसल्याने ग्रामीण भागातील मुले पाठ फिरवत आहेत.
- शुभम मिसाळ, क्लासचालक
--------------
स्पर्धा परीक्षांबाबत शासनाने ठोस धोरण घेतले पाहिजे. विस्कळीतपणामुळे विद्यार्थीही गोंधळलेले आहेत. त्यात कोरोनामुळे आणखी परिणाम झाला असून ४० टक्के विद्यार्थी कमी झाल्याचे दिसते आहे. शासनाने आता ॲाफलाइन क्लासला परवानगी द्यायला हवी.
- अभिजित घोलप, क्लास शिक्षक