खासदार विखेंचे लोकसभेत ‘मराठीच बोलू कौतुके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:11+5:302021-03-24T04:19:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले डॉ. सुजय विखे हे उच्चशिक्षित खासदार म्हणून ख्यात ...

खासदार विखेंचे लोकसभेत ‘मराठीच बोलू कौतुके’
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले डॉ. सुजय विखे हे उच्चशिक्षित खासदार म्हणून ख्यात आहेत. त्यामुळेच लोकसभेत गेल्यानंतर त्यांनी त्यांचे मुद्दे अस्खलित इंग्रजी भाषेतून मांडले. लोकसभेतील भाषणे जेव्हा सोशल मीडियावर प्रसारित होतात, त्यावेळी इंग्रजी, हिंदीपेक्षा मराठी भाषणांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळेच डॉ. विखे आता मराठीकडे वळले आहेत. आतापर्यंत झालेल्या चार मराठी भाषणांना चांगली पसंती मिळाली आहे.
लोकसभेची २०१९ मध्ये निवडणूक झाली. डॉ. सुजय विखे हे दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर जुलैमध्ये लोकसभेचे अधिवेशन झाले. त्यांचे पहिले भाषण इंग्रजीमधूनच झाले. जिल्ह्यातील महामार्गांच्या दुरुस्तीचा मुद्दा यांनी प्रथमच मांडला होता. विखे यांचे हे लोकसभेतील पहिलेच भाषण असल्याने ते इंग्रजीतून असले तरी या भाषणाला सर्वाधिक पसंती मिळाली होती. तब्बल ७७ हजार जणांनी हे भाषण ऐकले. त्यानंतर त्यांनी कधी इंग्रजीतून, तर कधी हिंदीतून भाषणे केली. मात्र, सामान्य माणसांना खासदारांनी लोकसभेत काय मुद्दे मांडले हे कळणे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सोपे झाले आहे. त्यामुळेच विखे यांची आयटी टीम लोकसभेतील प्रत्येक भाषण सोशल मीडियावर शेअर करीत आहे. लोकसभेत आतापर्यंत खासदार डॉ. विखे यांची २१ भाषणे झाली आहेत. विखे हे प्रथमच लोकसभेत गेल्याने त्यांच्या इंग्रजी-हिंदी भाषणांनाही चांगली पसंती मिळाली. मात्र, त्यासाठी जास्त कालावधी गेला. ६ डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी लोकसभेत पहिल्यांदा मराठीत भाषण केले. त्याला २२ हजार व्ह्युज मिळाल्या. त्यानंतर त्यांनी थेट काल-परवा म्हणजे १८ मार्च, २० मार्च आणि २३ मार्च २०२१ रोजी लोकसभेत मराठीतून मुद्दे मांडले. १८ मार्चच्या मराठी भाषणाला चार दिवसांत दहा हजारांच्यावर व्ह्युज मिळाल्या आहेत. इंग्रजी व हिंदी भाषणांना दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे व्ह्युजची संख्या अधिक दिसते आहे. त्या तुलनेत मराठी भाषणांना केवळ चार दिवसांत दहा हजारांच्यावर व्ह्युज मिळणे ही मराठी भाषेला पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेसबुकपेक्षा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक भाषणे ऐकल्याचेही दिसते आहे.
-------------
अशी झाली भाषणे
भाषा भाषणांची संख्या सरासरी व्ह्युज
इंग्रजी ९ १५ हजार
हिंदी भाषणे ८ १५ हजार
मराठी भाषणे ४ १३ हजार
एकूण २१
-------------------
कोणते मुद्दे मांडले ?
किसान सन्मान निधी योजना, कोरोना उपचारासाठी मिळणारा निधी व उपाययोजना, महामार्गांची दुरुस्ती, रुंदीकरण, शिर्डी विमानतळ, अतिवृष्टीचे नुकसान, पर्यावरणाबाबत वायू शुद्धिकरण योजना, अर्थसंकल्प, नगर रेल्वे, के. के. रेंजचा प्रश्न, बीएसएनएल व महावितरण, नगर-शिर्डी रस्ता, कोरोना वॉरिअर्सचे आभार, कांदा निर्यात बंदी, साकळाई जलसिचंन योजना, डिंबे धरणाबाबतचे प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडून भरीव निधी देण्याची मागणी भाषणातून केली आहे.
-------------
शेतकऱ्यांचे प्रश्न मराठीत
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न खासदार डॉ. विखे यांनी मराठीतून मांडले आहेत, तर राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न हिंदी, इंग्रजीतून मांडले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच त्यांची तीन भाषणे मराठीतूनच झाली आहेत. ‘अध्यक्ष महोदय, मै अपनी बात मराठी में रखना चाहुंगा...’ असे सांगत खासदार विखे थेट मराठीतूनच विषयाला हात घालत आहेत. त्यामुळेच त्यांची ही भाषणे शेतकरी, सामान्य नागरिक आणि सोशलवर सक्रिय असलेल्या तरुणांच्या पसंतीस उतरली आहेत.
----------------
लोकसभेत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य असतात. त्यामुळे आपण मांडलेला मुद्दा सर्वांना समजला पाहिजे, या हेतूने सुरुवातीला इंग्रजीतून व नंतर हिंदीतून मुद्दे मांडले. पंतप्रधानांनाही आपले प्रभुत्व कशात आहे, हे समजले पाहिजे. यासाठी प्रत्येक खासदार इंग्रजीतून बोलण्यासाठी आग्रही असतो. मात्र, लोकसभेतील भाषणे जेव्हा सोशल मीडियावर पाठवतो, त्यावेळी मराठी भाषणच जास्त ऐकली जातात, हे पाहून आनंद झाला. स्थानिक मुद्दे मराठीतूनच मांडले पाहिजेत, असेच मला वाटते.
-डॉ. सुजय विखे, खासदार
-----------------
फोटो- २३ सुजय विखे लोकसभा