अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल

By Admin | Updated: June 26, 2014 00:43 IST2014-06-25T23:43:30+5:302014-06-26T00:43:47+5:30

श्रीरामपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाच्या राजकारणाने प्रतिगामी म्हणजे मागे जाणारे, उजव्या विचारांकडे वळण घेतले आहे.

Moving towards presidential democracy | अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल

अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल

श्रीरामपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाच्या राजकारणाने प्रतिगामी म्हणजे मागे जाणारे, उजव्या विचारांकडे वळण घेतले आहे. सत्तारूढ झालेले सरकार भाजपचे नसून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार आहे. ज्यांचे सरकार आले व राज्यात ज्यांचे सरकार येण्याची शक्यता आहे, तेच दलित, गरिबांवर अत्याचार करणाऱ्या विचारांचे असल्यामुळे येत्या काळात या वर्गावर हल्ले आणखी वाढतील, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नियंत्रण आयोगाचे सचिव गोविंद पानसरे यांनी दिला.
बुधवारी येथे कॉ. पानसरे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘रा. स्व. संघाचे हे सरकार भारतीय राज्य घटनेतील तत्वाविरूद्ध व्यवहार करणारे आहे. घटनेने संसदीय पद्धतीची लोकशाही स्वीकारली. लोकांनी खासदार निवडायचे व खासदारांनी त्यांचा नेता किंवा पंतप्रधान निवडण्याची पद्धत आहे. पण रा. स्व. संघाने अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार केला आहे. या निवडणुकीत लोकशाहीला संसदीय पद्धतीपासून अध्यक्षीय पद्धतीकडे नेणारा प्रचार झाला. सामुदायिकपणाऐवजी संघाच्या तत्वानुसार व्यक्तीकेंद्रीय राजकारणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. चातुर्वर्ण्य व उच्च नीचता, परधर्मद्वेष हा संघाचा मुख्य घटक आहे.
काँग्रेस-भाजपचे आर्थिक धोरण सारखेच आहे. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, विषमता वाढली. याची प्रतिक्रिया म्हणून भाजपला मते मिळाली. यात डाव्या चळवळीची उडालेली शकले डाव्यांची पीछेहाट होण्यास कारणीभूत ठरली. आम्ही अर्थवाद, आर्थिक मागण्यांपुरतेच अडकून पडलो. आमच्या संघटनांचे राजकीयीकरण करण्यात आम्ही कमी पडलो, असेही ते म्हणाले.
यावेळी ए.आय.एस.एफ.चे प्रदेशाध्यक्ष संजय नागरे, उमा पानसरे, बाळासाहेब सुरूडे, राजेंद्र बावके हजर होते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रतिगामीच
महाराष्ट्र पुरोगामी हे विधान चूकच आहे. शाहू, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात होऊन गेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलित, महिलांवर अत्याचार याच राज्यात सर्वाधिक आहेत. मग महाराष्ट्र पुरोगामी कसे? डॉ. आंबेडकरांनंतर ६० वर्षात तेवढ्या उंचीचे व्यक्तिमत्त्व राज्यात झाले नाही. काँग्रेस राजवटीतही अत्याचार झालेच. आता ते आणखी वाढतील. त्यामुळे महाराष्ट्र प्रतिगामीच आहे.
पुण्यात शिबिर
डाव्या विचारांच्या चळवळीस गती देण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी पुण्यात एक शिबिर आयोजिण्यात आले आहे. त्यात भाकप, माकप, लाल निशाण पक्ष, लेनिनवादी, भारिप-बहुजन महासंघ, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, विद्रोही साहित्यिक चळवळीचा समावेश राहील. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, पुष्पा भावे, मुक्ता मनोहर आदी मार्गदर्शन करतील़

Web Title: Moving towards presidential democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.