लमाणतांड्याला डोंगराचा धोका

By Admin | Updated: August 7, 2014 00:07 IST2014-08-07T00:02:20+5:302014-08-07T00:07:22+5:30

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील डोंगर माथ्याच्या कुशीत वसलेल्या सेवानगर-लमाणतांड्याला डोंगरावरील दरडीचा धोका संभवतो. येथील शेकडो कुटुंब सध्या भीतीखाली जीवन जगत आहेत.

Mountainous danger | लमाणतांड्याला डोंगराचा धोका

लमाणतांड्याला डोंगराचा धोका

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील डोंगर माथ्याच्या कुशीत वसलेल्या सेवानगर-लमाणतांड्याला डोंगरावरील दरडीचा धोका संभवतो. येथील शेकडो कुटुंब सध्या भीतीखाली जीवन जगत आहेत.
शेवगाव तालुक्यापासून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस कि. मी अंतरावरील नागलवाडी गावात समावेश असलेल्या व अत्यंत डोंगर कपारीलगत सेवानगर-लमाणतांडा आहे. बंजारा समाजाची शेकडो कुटुंब डोंगर पायथ्याशी रहातात. काही कुटुंब डोंगर कुशीत असून लगत उंच डोंगर असून त्यावर मोठे मोकळे दगड आहेत. डोंगरावरील मोकळे दगड व दरड कोसळल्यास भविष्यात जीवितहानी घडू शकते.
तांड्यावरील काहीजण उपजिवीकेसाठी ऊस तोडणी व कोळसा कामासाठी सहा ते सात महिने परगावी स्थलांतरीत असतात. वयोवृद्ध, लहान मुले येथे वास्तव्यास असतात. (वार्ताहर)
दरोडी डोंगरावरील दगड तोडण्याचा अहवाल
पारनेर : तालुक्यातील दरोडी येथील डोंगराच्या कुशीतील धोकादायक घरांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यासाठी डोंगरावरील मोठे दगड फोडावे लागतील, असा अहवाल बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला असून यात भू-गर्भ तज्ञांचे मार्गदर्शन मागवावे लागणार आहे. याबाबत येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे.
पारनेर तालुक्यातील अळकुटीपासून चार ते पाच कि़ मी.अंतरावरील दरोडी गावात सुमारे तीस ते चाळीस कुटुंब डोंगर कुशीत रहात असून त्यांना डोंगरावरील दरडींचा व मोठ्या दगडांचा धोका आहे. त्यामुळे दरोडी गावावर दरडीची टांगती तलवार आहे. येथील रहिवाशांचा जीव टांगणीला असल्याचे वास्तव वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिध्द केले होते. या वृत्तामुळे पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तसेच ‘लोकमत’ ने पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटनेनंतर दरोडी येथील गावाची व्यथा जागरूकपणे हा विषय प्रशासन व लोकांपर्यंत पोहोचवल्याने सर्व स्तरातून या वृत्ताचे कौतूक करण्यात आले. दरोडी येथे राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले बहाउद्दीन चिश्ती बाबांचा दर्गा प्रसिध्द आहे. राज्यभरातील अनेकांनी या वृत्तामुळे आपल्या नातेवाईकांशी चर्चा केली.
‘लोकमत’ ने दरोडीची व्यथा मांडल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शुकवारी दुपारी सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार दत्तात्रय भावले यांनी दरोडी येथील धोकादायक डोंगर व मोठ्या दगडांची पाहणी करुन ग्रामस्थांशी चर्चा केली.
(तालुका प्रतिनिधी)
सुविधांचा अभाव
सेवानगरला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाला असूनही येथे गावठाणाला पुरेशी जागा नाही. खासगी जागेत काही कुटुंब रहातात. येथील लोकांना वीज, रस्ते, पिण्याच्या पाण्यासह इतर प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. दरडी कोसळल्यास मोठा धोका संभवतो. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी.
- संजय वडते, माजी सरपंच
दोष कोणाला द्यायचा?
आमच्या कुटुंबातील अनेकजण कामानिमित्त परगावी असतात. घरी वृद्ध व मुले असतात. नैसर्गिक संकट आल्यास दोष कोणाला द्यायचा.
-जिजाबाई वडते, स्थानिक रहिवासी
अधिकाऱ्यांकडून
डोंगराची पाहणी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पारनेरचे उपअभियंता व इतर अधिकाऱ्यांच्या समितीने मंगळवारी पुन्हा दरोडी येथील डोंगराची पाहणी केली. डोंगरावरील मोठे दगड फोडावे लागतील, हे दगड फोडतांना परिसरातील कुटुंबांना सुुरक्षित स्थळी काही काळ हलवावे लागणार आहे, किंवा जागेवरच ते दगड फोडता येतात का? याची भू-गर्भ तज्ञांकडून तपासणी करण्यात येईल व त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. याचा अहवाल जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिल्यानंतर ते व पोलीस अधिक्षकांची बैठक होऊन यावर चर्चा होईल. व आठवडाभरात दगड काढली जातील, असे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Mountainous danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.