करंजीनजीक कार धडकेने मोटारसायकलस्वार ठार; तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:16 IST2020-02-05T18:15:47+5:302020-02-05T18:16:54+5:30
पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगात जाणा-या इनोव्हा कारने नगरहून येणा-या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर तीन जण जखमी झाले.

करंजीनजीक कार धडकेने मोटारसायकलस्वार ठार; तीन जण जखमी
करंजी : पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगात जाणा-या इनोव्हा कारने नगरहून येणा-या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर तीन जण जखमी झाले. अपघातानंतर कारही रस्त्याजवळील शेतात जावून पडली. नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजीनजीक अपूर्वा हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
नगर-पाथर्डी महामार्गावर करंजी गावाजवळील हॉटेल अपूर्वाजवळ मढी, मायंबा, वृद्धेश्वर देवस्थानचे दर्शन करून येत असलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारने (एम.एच.-०१, बी. जी.-८४६०) नगरहून पाथर्डीकडे येत असलेल्या पाथर्डीतील तरूण व्यापारी भूषण अरूण चिंतामणी (वय ४०) यांच्या टीव्हीएस स्पोर्टस मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात भूषण चिंतामणी हे जागीच ठार झाले. अपघातानंतर कार तीन-चार वेळा उलटून जवळच्या शेतात जावून पडली. कारमधील तिघे जबर जखमी झाले आहेत. अपघात घडताच कारमधील एयर बॅग उघडल्याने दोन वेळा कार उलटून घरंगळत शेतात गेली. यामुळे कारमधील प्रवाशी बालंबाल बचावले. भूषण चिंतामणी हे पाथर्डीतील तरुण सोन्याचे व्यापारी होते. त्यांच्या मनमिळावू व शांत स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच पाथर्डी शहरातील नव्हे तर तालुक्यातील बाजारपेठेत शोककळा पसरली.