आई म्हणते पळवून नेले, मुलीने सांगितले मर्जीने गेले; शहरात रात्री रंगला प्रेम प्रकरणाचा ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 07:45 IST2021-06-01T07:45:04+5:302021-06-01T07:45:53+5:30
अकोले येथील एका शिक्षिकेने रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. त्यात तिने आपल्या २५ वर्षीय मुलीला एका मुलाने पळवून नेऊन जबरदस्तीने लग्न करण्यासाठी डांबून ठेवले असल्याची तक्रार दिली होती.

आई म्हणते पळवून नेले, मुलीने सांगितले मर्जीने गेले; शहरात रात्री रंगला प्रेम प्रकरणाचा ड्रामा
अहमदनगर : लग्नासाठी माझ्या मुलीस एका तरुणाने डांबून ठेवले असल्याची तक्रार करणाऱ्या महिलेसमोर पोलिसांनी तिच्या मुलीला हजर केल्यानंतर सर्वासमक्ष मुलीने ‘माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी मर्जीनेच त्याच्यासोबत आले आहे’. असा जबाब देताच सदर महिलेस धक्काच बसला अन् त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारी रात्री उशिरा नगर शहरात हा प्रेम प्रकरणाचा ड्रामा रंगला.
अकोले येथील एका शिक्षिकेने रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. त्यात तिने आपल्या २५ वर्षीय मुलीला एका मुलाने पळवून नेऊन जबरदस्तीने लग्न करण्यासाठी डांबून ठेवले असल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत रविवारी रात्री तत्काळ त्या तरुण-तरुणीचा शोध घेऊन दोघांनाही लालटाकी परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांंसमोर येताच मुलीने, मला कुणीही पळवून आणले नसल्याचा जबाब दिला.
मुलगी स्नेहालयात
तरुणीचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी तिला स्नेहालय संस्थेत दाखल केले आहे. तर तिच्यासोबत असलेल्या तरुणावर सध्या तरी काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. हा तरुण नगर येथीलच असून, पुणे येथे ते दोघे जण सोबत काम करत होते.