ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच महावितरणच्या जास्त तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:12+5:302021-09-18T04:22:12+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने ...

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच महावितरणच्या जास्त तक्रारी
केडगाव : नगर तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही वैतागले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील जेऊर परिसरातच शेतकऱ्यांच्या विजेच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.
नगर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. तालुक्यात अनेक रोहित्र नादुरुस्त अवस्थेत आहेत. महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून रोहित्र तत्काळ बदलून मिळत नाहीत. तालुक्यातील बहुतेक विद्युत वाहिन्यांचे काम हे १९७० ते ८० च्या दशकात झालेले आहे. त्या विद्युत वाहिन्यांमध्ये सध्या मोठा झोळ पडलेला दिसतो. तसेच विद्युत वाहिन्यांचे खांबही अनेक ठिकाणी तिरपे झालेले आहेत. जुन्या विद्युत वाहिन्या असल्याने वारंवार काही ना काही बिघाड होत आहे. त्या दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारीही वैतागले आहेत.
ग्रामीण भागात रोहित्र जळाले अथवा रोहित्रामध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य शेतकरी वर्गणी करून आणत आहेत. महावितरण कंपनी बिल वसूल करते, मग दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे का आकारले जातात, असा सवाल शेतकरी करीत आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील जेऊर परिसरात विजेच्या प्रश्नावरून मागील आठवड्यात महावितरण विरोधात आंदोलनही झाले. मात्र त्यात अद्यापही सुधारणा झालेली नाही.
---
शेतीसाठी दिवसा ८ तास व रात्री १० तास वीज मिळते. मात्र त्यातही बहुतांशी वेळा अचानक वीज गायब होते. वीज गेली की कधी येईल ते सांगता येत नाही. दिवसातून चार-पाच वेळा वीज गायब होते. यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी वीजपंप चलत नाहीत.
-अशोक कोकाटे,
ग्रामपंचायत सदस्य, चिंचोडी पाटील
-----
वाळकी व रुईचा भाग मिळून एकच फेज आहे. वाळकीतील आमराईवाडीत सिंगल फेज असल्याने अनेकवेळा दिवे उडतात. वीज जास्त काळ टिकत नाही. पूर्ण क्षमतेने रोहित्र चालत नाही. शेतीला पाणी देण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. रुई व वाळकीसाठी स्वतंत्र फेज हवी.
-देवराम भालसिंग,
शेतकरी, वाळकी
----
जेऊर परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून, शेतकरी वर्ग वैतागला आहे. कांदा लागवड सुरू असून, विजेअभावी मजुरांचा खोळंबा होत आहे. मजूर बसून राहत आहेत, तरी शेतकऱ्यांना त्यांची रोजंदारी द्यावीच लागते. काही शेतकरी डिझेल इंजिनच्या साहाय्याने कांदा लागवड करत आहेत. त्यामुळे डिझेलच्या खर्चामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष आहे.
-गोरक्षनाथ नानाभाऊ तोडमल,
शेतकरी, जेऊर
----
जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीचे काम चालू आहे. केडगाव लाईनवर भिस्तबाग व जेऊर दोन सबस्टेशन सुरू आहेत. त्यामुळे ओव्हरलोड होऊन जेऊर सेक्शनला समस्या वाढल्या आहेत. नगर तालुक्यात सर्वात जास्त थकबाकी जेऊर सेक्शनचीच आहे. वीज बिलमाफीसाठी योजना आणूनही शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही. कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढेसुद्धा उत्पन्न मिळत नाही. सर्व नागरिकांनी थकबाकी भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे.
-किसन कोपनर,
उपकार्यकारी अभियंता, महावितरण