चोरीचे दागिने ठेवले पतसंस्थेत गहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:43+5:302021-02-12T04:20:43+5:30

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बॅगेमधे ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास ...

Mortgages in credit unions kept stolen jewelry | चोरीचे दागिने ठेवले पतसंस्थेत गहाण

चोरीचे दागिने ठेवले पतसंस्थेत गहाण

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बॅगेमधे ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा. समशेरपूर, ता. अकोले) यास अटक करून १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आश्चर्य म्हणजे आरोपीने चोरीचे दागिने एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज काढलेही होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील दि. १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भाऊपाटील देवराम नवले (४१) यांच्या घरासमोरून बॅगेतून ७५ हजार रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान तसेच प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे कॉईन मिळून एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास करण्यात आले होते.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की भाऊपाटील नवले यांनी मुंबई येथून भावाला व बहिणीला गावी मालदाड येथे आणण्यासाठी चारचाकी गाडी पाठविली होती. सदर गाडीवर चालक म्हणून रविकिरण सुखदेव मंडलिक हा पाठविला होता. १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजता रविकिरण मंडलिक याने भाऊपाटील नवले यांच्या भावाला व बहिणीला मालदाड येथे घरी आणून सोडले. यावेळी गाडीतील बॅगा रविकिरण मंडलिक याने घरासमोर आणून ठेवल्या होत्या. बहीण मानसी राहुल वाळूंज ही ३१ जानेवारी २०२१ रोजी मुंबई येथे जाण्यासाठी निघाली असता बॅगमधे दागिने नव्हते. त्यामुळे गाडीचा चालक रविकिरण मंडलिक यानेच दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद भाऊपाटील देवराम नवले (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिली होती. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक यास ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात आरोपीने १० ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे काॅईन राहाता येथील सोनारास विकले होते, तर संगमनेर येथील एका पतसंस्थेत ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे गहाण ठेवून कर्ज काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

Web Title: Mortgages in credit unions kept stolen jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.