निम्म्याहून अधिक उमेदवारांची दांडी
By Admin | Updated: June 7, 2014 00:18 IST2014-06-06T23:12:58+5:302014-06-07T00:18:14+5:30
अहमदनगर : पोलीस शिपाई पदासाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला पहिल्याच दिवशी निम्म्याहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली़
निम्म्याहून अधिक उमेदवारांची दांडी
अहमदनगर : पोलीस शिपाई पदासाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला पहिल्याच दिवशी निम्म्याहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली़ प्राप्त अर्जापैकी पात्र दीड हजार उमेदवारांना पहिल्या दिवशी शुक्रवारी निमंत्रित करण्यात आले होते़ यापैकी केवळ ६९० उमेदवारांनी भरतीला हजेरी लावली असून, त्यांची ८० गुणांची मैदानी चाचणी घेऊन भरतीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे़
राज्यभर पोलीस भरती प्रक्रियेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला़ नगर जिल्ह्यातील १५९ जागांसाठी ९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत़ त्यापैकी दीड हजार पात्र उमेदवारांसाठी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी सहा वाजता भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली़ बाहेरगावचे उमेदवार गुरुवारी रात्रीच मुख्यालय परिसरात दाखल झाले होते़ सकाळी पहिल्या टप्प्यात २० जणांचा गु्रप करून त्यांना भरतीसाठी प्रवेश देण्यात आला़ कागदपत्रांची छाननी करण्याचा पहिला टप्प्पा होता़ त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच फक्त छाती व उंची मोजण्यात आली़ त्यासाठी चार टेबल ठेवण्यात आले होते़ हा टप्पा पूर्ण केलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी प्रवेश देण्यात आला़ प्रत्येक उमेदवारांची इन कॅमेरा चाचणी घेण्यात आली़ दुपारी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती़ रखरखत्या उन्हात धावण्याची चाचणी घेण्यात आली़ या चाचणीत पात्र ठरलेल्यांची शनिवारी पहाटे निंबळक रस्त्यावर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे़
त्यामुळे उमेदवारांचा शहरातील मुक्काम एक दिवसांनी वाढला आहे़ मैदानी चाचणीचे गुण उमेदवारांना जागेवरच देण्यात आले आहेत़ समाधानकारक गुण न मिळालेल्यांनी दुपारीच घरचा रस्ता धरला़ तसेच उर्वरित पात्र उमेदवारांची मैदानी चाचणीही शनिवारी सुरू राहणार आहे़ मात्र शुक्रवारी गैरहजर असणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही़ पुढील दीड हजार उमेदवारांच्या यादीनुसार भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे़
उमेदवारांनी रात्र काढली जागून
पहाटेच भरती सुरू होणार असल्याने बाहेरगावचे उमेदवार गुरुवारी रात्रीच शहरात दाखल झाले़ मात्र प्रशासनाकडून राहण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती़ त्यामुळे उमेदवारांनी उघड्यावर, रस्त्याच्याकडेला रात्र जागून काढली़ त्यात पाऊस झाल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली़ काही उमेदवार भरतीपूर्वीच आजारी पडले़ त्यामुळे त्यांना भरतीला मुकावे लागले़
भरतीचे चित्रीकरण
भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी प्रत्येक उमेदवाराचे चित्रीकरण करण्यात आले आहे़ सर्व चाचण्यांचे पोलिसांकडून चित्रीकरण करण्यात आले असून, कुणी आक्षेप घेतल्यास त्यांना ते पुन्हा दाखविण्यात येते़
काळे, निळे आणि पिवळे कार्ड
मैदानी चाचणी घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यात ५०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येते़ ही चाचणी दुसऱ्या दिवशी घेतली जाते़ याचा गैरफायदा घेऊन काहीजण डमी उमेदवार उभे करत असल्याने पात्र उमेदवारांना काळे, निळे आणि पिवळे कार्ड दिले जाणार आहे़
महिला पोलिसांची कसरत
उमेदवारांची चाचणी घेण्याची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपविण्यात आली होती़ उमेदवारांचे गट तयार करून चाचणी घेण्यात येत होती़ ही चाचणी घेताना महिला पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ उडाली़ काहींनी त्रास नको म्हणून दवाखान्याचे कारण पुढे करून पळ काढला़