आंदोलनांनी दणाणला सोमवार
By Admin | Updated: August 12, 2014 02:03 IST2014-08-12T01:55:01+5:302014-08-12T02:03:17+5:30
अहमदनगर: मुकुंदनगर भागातील नागरिकांना सुविधा देता येत नसतील तर महापालिका हद्दीतून वगळा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. नागरी सुविधेसाठी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला.

आंदोलनांनी दणाणला सोमवार
अहमदनगर: मुकुंदनगर भागातील नागरिकांना सुविधा देता येत नसतील तर महापालिका हद्दीतून वगळा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. नागरी सुविधेसाठी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला. दोन तास मोर्चेकरी महापालिकेसमोर ठिय्या मांडून बसले होते.
गत अकरा वर्षापासून मुकुंदनगरमधील नागरिक नागरी सुविधेमुळे त्रस्त आहेत. मोर्चे, आंदोलन, निवेदन देऊनही महापालिका प्रशासन काहीच करत नाही. दहा वर्षापूर्वी मुकुंदनगर भागात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचे भूमिपूजन झाले. पाच वर्षापूर्वी कोनशीला बसली. आजमितीला फक्त टाकी उभी राहिली. इतके दिवस होऊनही पाण्याची टाकी पूर्ण होऊ शकली नाही. या कामास दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. फकिरवाडा, दर्गादायरा व गोविंदपुरा भागातील रस्ते नगरोत्थान योजनेतून सुरू आहे. पण ते अजूनही पूर्ण झालेले नाही. रस्ते जोपर्यंत दुरूस्त होत नाही तोपर्यंत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना पालिकेने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसा ठराव महासभेत पारित करावा असे आंदोलकांचे म्हणणे होते. मुकुंदनगर परिसरात भाजी मार्केट, खेळाचे मैदान, दवाखाने, सांस्कृतिक भवन कधी अस्तित्वात येणार याचे लेखी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. या मागण्या सहा महिन्यात पूर्ण न झाल्यास मुकुंदनगरला महापालिका हद्दीतून वगळून दर्गादायरा-फकिरवाडा ग्रामपंचायतीत विलीन करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी दोन तास ठिय्या मांडला. प्रशासकीय अधिकारी चर्चेसाठी बाहेर येत नसल्याने आंदोलक संतप्त झाले. मुकुंदनगरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आमदार अनिल राठोड हेही महापालिकेत पोहचले. त्यांच्या मध्यस्थीने आयुक्त विजय कुलकर्णी हे आंदोलनकर्त्यासमोर आले. निवेदन स्वीकारल्यानंतर मंगळवारी मुकुंदनगर परिसरातील नागरिक, संबंधित ठेकेदार यांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर मोर्चा विसर्जित झाला. (प्रतिनिधी)