अहमदनगर : नगरमध्ये कार्यरत असलेल्या पुरुष हक्क संरक्षण समितीचे फेसबुक अकाउंट हॅक करुन त्या माध्यमातून फेसबुक मित्रांबरोबर चॅटिंग करून पैसे मागितल्याचा प्रकार सोमवारी (दि.११) समोर आला आहे. या प्रकरणी समितीचे संचालक अॅड. शिवाजी कराळे यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.कौटुंबिक वादात अत्याचाराचा बळी ठरणा-या पुरुषांना मदत करण्यासाठी अॅड. कराळे यांनी पुरुष हक्क संरक्षण समितीची स्थापना केली आहे. नगरमधील नाट्य कलावंत प्रशांत गणपत जठार यांना पुरुष हक्क समितीच्या फेसबुक अकाउंटवरून कराळे यांच्या नावाने एक मेसेज आला होता. यात दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात पुरुष हक्क संरक्षण समितीचे फेसबुकवरील अकाउंट गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते. दरम्यान जठार यांनी पैशांबाबत कराळे यांना विचारणा केली, तेव्हा हा मेसेज कराळे यांनी पाठविला नसल्याचे समोर आले. त्या अकाऊंटवरुन होणारी फसवणुकीची माहिती जठार यांनी कराळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर कराळे यांनी सायबर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार केली.पुरुष हक्क समितीचे फेसबुक अकाऊंट कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केले होते. त्यावरून माझ्या मित्रांना आणि इतर लोकांना मेसेज पाठवून गुगलपे नंबरवर पैशांची मागणी केली. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच हे अकाऊंट टेक्निकल टीमने रिकव्हर केले आहे, असे पुरुष हक्क संरक्षण समितीचे संचालक अॅड. शिवाजी कराळे यांनी सांगितले.
फेसबुक अकाउंट हॅक करून मागितले पैसे; पुरुष हक्क संरक्षण समितीची फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 11:40 IST