अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
By Admin | Updated: July 22, 2014 00:08 IST2014-07-21T23:19:54+5:302014-07-22T00:08:47+5:30
जामखेड : बलात्काराचा गुन्हा; आरोपीस कोठडी

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे़ आरोपीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर भगवान घुमरे (रा. घुमटी ता. कर्जत) याने ७ मे २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास फक्राबाद येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले होते. या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी शोधाशोध करुन मुलगी सापडली नाही़ नंतर तिला आरोपी ज्ञानेश्वर घुमरे याने पळवून नेल्याचे वडिलांना समजले़ त्यांनी जामखेड पोलिसांत १३ मे रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी मुलीचा शोध घेतला़ तब्बल दोन महिन्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर घुमरे याला पिडीत अल्पवयीन मुलीस आरोपीच्या कर्जत तालुक्यातील घुमरी येथून १७ जुलै रोजी ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांची वैद्यकीय तपासणी केली असता सदर मुलगी ही गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी घुमरे वर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात दाखल केले आहे़
(तालुका प्रतिनिधी)