अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
By Admin | Updated: June 27, 2014 00:20 IST2014-06-27T00:05:54+5:302014-06-27T00:20:14+5:30
अहमदनगर : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा.

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
अहमदनगर : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, मुंबईतील कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यातील अहमदनगरसह ६ जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बाल्यमन हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे.
‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात राज्यातील मुंबई, कल्याण, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांत १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात १० ते १४ वर्षे वयोगटातील १५२, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३३६ व १९ वर्षांवरील १२ जणांचा समावेश होता. यात १९२ मुली व ३०८ मुलांना सहभागी करण्यात आले. १९८ मुला- मुलींनी वयाच्या १० वर्षांपासून, तर ३०२ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.
६७ टक्के मुला- मुलींनी सांगितले की, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले आहेत. ७४ टक्के जण इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत.
५५ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत, तर ६० टक्के जण चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ७७.६ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील ६६.२ टक्के मुला-मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ४२.२ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले.
सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई-वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैनी थांबत नाही.
पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हाताळावा, अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
इंटरनेट आॅडिक्शन
जिज्ञासा आणि व्यसन यात फरक आहे. काही मुले जिज्ञासेपोटी हे व्हिडिओ पाहतात. काहींना मात्र, त्याचे व्यसन लागले आहे. पूर्वी पिवळे साहित्य वाचले जायचे. आज मोबाईलमुळे व्हिडिओ, साईट सहजी उपलब्ध होत असल्याने मुलीही त्यात ओढल्या आहेत. पौगंडावस्थेतील मुली रोमँटिक असतात, तर मुलांना सेक्सची ओढ असते. मानसिक पातळीवर हा व्यवहार चालतो. आपल्याकडे लैंगिक शिक्षणाची सोय नसल्याने मुलांना अशा व्हिडिओची जिज्ञासा वाटते. मुलांना शास्त्रीयदृष्ट्या लैंगिक शिक्षण शाळांमधून दिल्यास असे प्रकार कमी होतील. अन्यथा असे व्हिडिओ पाहून वाममार्गाला लागण्याची शक्यता जास्त असते. पालकांनी मुलांवर लक्ष द्यायला हवे.
-डॉ. वसंत देसले,
मानसशास्त्राचे प्राध्यापक
सामाजिक दुष्परिणाम
स्मार्ट फोनमुळे मुलांचे भावविश्वच बदलून गेले आहे. याचे दुष्परिणाम समाजात दिसून येतात. यापुढे व्यसन असेच जडत गेले तर फार मोठ्या परिणामांना समाजाला सामोरे जावे लागेल. भविष्यात ते कोणत्या पातळीपर्यंत जातील, याची कल्पनाही करवत नाही. अश्लिल व्हिडिओ पाहण्याचे हे लोण खेड्यातही पोहोचले आहे. ते व्यसन दारूपेक्षाही वाईट आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्षच यास कारणीभूत आहे. पालकांसोबत शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना हातात कोणत्या वयात स्मार्ट फोन द्यावा, हे ठरवावे. परदेशात फोनच्या व्यसनामुळे घटस्फोट होतात. मुलांना दूध पाजायलाही त्यांच्याकडे वेळ नाही. ही वेळ आपल्याकडे येऊ नये.
-डॉ. शरद कोलते,
समाजशास्त्रज्ञ, नगर
सर्वेक्षण कसे केले
कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेश शेळके, सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता कुलकर्णी,
प्रा. युसूफ बेन्नुर व प्रा. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व्हे एप्रिल-मे २०१४ दरम्यान राज्यातील ६ जिल्ह्यांत करण्यात आला. रेणुका कड, मयुरी मालवी, करुणा महंतारे, सरिता तिवारी, कविता सरविय्या यांनी सर्व्हे केला. सहा जिल्ह्यांतील १० ते १९ वर्षे वयोगटातील ५०० मुला-मुलींशी संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका भरून घेण्यात आली. त्यातून रँडम सॅम्पलिंग पद्धतीने सारणी, विश्लेषण, शोध आणि शेवटी निष्कर्ष काढण्यात आले.