मिनरल वॉटर उद्योगासाठी लाखो लीटर पाणी
By Admin | Updated: April 1, 2016 00:53 IST2016-04-01T00:50:32+5:302016-04-01T00:53:21+5:30
अण्णा नवथर, अहमदनगर अहमदनगर : एकीकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता पाण्यावाचून तहानली आहे. अनेक गावांच्या घशाला कोरड पडली आहे.

मिनरल वॉटर उद्योगासाठी लाखो लीटर पाणी
अण्णा नवथर, अहमदनगर
अहमदनगर : एकीकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता पाण्यावाचून तहानली आहे. अनेक गावांच्या घशाला कोरड पडली आहे. दुसरीकडे औद्योगिक वसाहतीत बाटली बंद पाण्याच्या कारखान्यांना मात्र मुळा धरणातून २४ तास आणि लाखो लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या या कारखान्यांबाबत दुष्काळात काय धोरण घ्यायचे, याबाबत शासनाचा काहीही आदेश नाही. त्यामुळे प्रशासनाने ‘हाताची घडी, तोंडावर बोट’, अशी भूमिका घेतली आहे. दुष्काळी स्थितीत प्रशासनाची भूमिका आश्चर्यकारक आहे.
जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आहे़ टँकरने पाचशेचा आकडा पार केला आहे़ गावोगावचे उदभव कोरडे पडू लागले आहेत़ दक्षिण जिल्ह्यात मुळा धरण हा एकमेव मोठा जलस्त्रोत आहे़ त्यावर या भागाची भिस्त आहे़ या धरणात सध्या अवघे पावणे तीन टीएमसी पाणी आहे़ उपलब्ध
पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे सरकारचे आदेश आहेत़ धरणांतील पाण्याचा काटकसरीने वापर होतो का ? याची शहानिशा केली असता वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ नागापूरसह सुपा औद्योगिक वसाहतींतील बाटली बंद पाणी तयार करणाऱ्या कारखान्यांना मुळा धरणातील शुध्द
पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे़ दोन्ही वसाहतीत असे ८ कारखाने सुरू आहेत़ या कारखान्यांना दररोज महामंडळाकडून ५० हजार लीटर पाणी मीटरव्दारे दिले जाते़ या पाण्यावर प्रक्रिया करून कारखानदार ते बाजारात विकतात.
नागापूरसह सुपा आणि नेवासा औद्योगिक वसाहतीसाठी दररोज ३२ एमएलटी पाणी मुळा धरणातून उपसले जाते़ त्यातून १ हजार ६७७ कारखान्यांना पाणी मिळते़ इतर उत्पादने घेणाऱ्या कारखान्यांना फारसे पाणी लागत नाही़ पण, बाटली बंद पाणी तयार करणाऱ्या कारखान्यांना भरपूर पाणी लागते. दुष्काळात या कंपन्यांचा व्यवसाय तेजीत आहे.
अनेक गावच्या पाणी योजना बंद पडतात. त्या खराब होतात. मात्र या कारखान्यांच्या पाणी पुरवठ्यात सहसा व्यत्यय येत नाही. टंचाईच्या काळात या कारखान्यांबाबत काय भूमिका घ्यायची याचे काहीही धोरण सरकारी दरबारी नाही. त्यामुळे ऐन दुष्काळातही या कारखान्यांचा पाण्याचा व्यापार जोरात सुरु आहे.
मुळा धरणातील पाण्यावर प्रक्रिया करून ते बाटलीव्दारे बाजारात विकले जाते़ उद्योगासाठी आरक्षित असलेल्या पाण्यातून या कारखान्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून हे पाणी पुरविण्यात येत आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लागणारा कच्चा माल शुध्द असल्याने कारखान्यांना त्यावर फार प्रक्रिया करावी लागत नाही़ कमी पैशात हा व्यवसाय सुरू होतो़
औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी एकत्र येऊन जिमखाना उभारला आहे़ त्यात मोठा जलतरण तलावही आहे़ तलावासह इतर कामासाठी जिमखान्याला औद्योगिक विकास महामंडळाकडून दररोज १० हजार लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो़ जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत़ मात्र औद्योगिक विकास महामंडळाला तसे आदेश प्राप्त झाले नाहीत़ त्यामुळे पाणीपुरवठा सुरूच असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़
औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून येणाऱ्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला जातो़ मीटरव्दारे त्यांना पाणी देण्यात येत आहे़ मिनरल वॉटरच्या कारखान्यांना पाणीपट्टी जास्त असून, त्यांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे़ आदेश आल्यास कारखान्यांचे पाणी खंडित केले जाईल़
-विनायक खांदवे, उपअभियंता
उद्योगासाठी मुळा धरणातील पाणी आरक्षित आहे़ त्यातून ते कारखान्यांना पाणी देतात़ ते कुणाला द्यावे हा त्यांचा अधिकार आहे़ मात्र पाणी कमी पडल्यास ते कोणत्या कारखान्यांना पाणी पुरवितात, याचा आढावा घेऊन कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाईल, परंतु, सध्या तरी तशी आवश्यकता वाटत नाही़
-अनिल कवडे,
जिल्हाधिकारी.