दूध उत्पादन वाढले
By Admin | Updated: June 12, 2014 00:10 IST2014-06-11T23:45:17+5:302014-06-12T00:10:12+5:30
पारनेर : रोज सव्वा लाख संकलन
दूध उत्पादन वाढले
पारनेर : तालुक्यातील सुपासह परिसरातील गावांमधील दूध उत्पादनात तीस ते चाळीस हजार लिटने वाढ झाली आहे़ दुधाला चांगला भाव मिळत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरत आहे़
सुपा सह पिंपरी गवळी, आपधुप, वाळवणे, रूई छत्रपती, रांजणगाव मशीद, बाबुर्डी, अस्तगाव, रायतळे, वांघुडे, पळवे यासह परिसरातील गावांमध्ये सध्या शेतकऱ्यांकडून दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. दुधाच्या व्यवसायातून दररोज शाश्वत पैसा मिळत असल्याने घरातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी उपयोगी ठरत आहे. पावसाच्या पाण्यावर शेती करीत असताना अनेकदा दुष्काळाचे संकट आले. त्यामुळे शेतीऐवजी गायी, म्हैस घेऊन दुध व्यवसायाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मागील वर्षी दुष्काळात सरकारने जनावरांना वाचविण्यासाठी छावणी सुरू केल्याने चारा व पशुखादय चांगल्या प्रमाणात मिळाल़े़ त्यामुळे जनावरे विक्री होण्यापासुन वाचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झाले. सुपा व एम.आय.डि.सी. परिसरात सात ते आठ दुध संकलन केंद्र आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी ऐंशी ते नव्वद हजार लिटर दुधाचे संकलन रोज होत होते़ मात्र, दुधाच्या दरात झालेल्या भाववाढीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी दुधव्यवसायाकडे वळाले आहेत़ त्यामुळे तीस ते चाळीस हजार लिटरने दूध संकलनात वाढ झाल्याचे केंद्र संचालक सांगतात़
सुपा व परिसरातील युवकही सध्या दुग्धव्यवसायाकडे वळाले आहेत. चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता चांगल्या प्रकारे दुधव्यवसाय केल्यास मोठे उत्पन्न मिळू शकते, असे शिक्षीत युवक सांगतात़ दुग्धव्यवसायात सध्या युवक मोठ्या प्रमाणात असल्याचे दुध संकलन केंद्राचे सुरेश थोरात व रावसाहेब मुंगशे यांनी सांगितले.
वर्षभरापुर्वी दुधाला लिटरमागे सोळा रूपये भाव होता. त्यावेळी शेतकऱ्यांना दुधाच्या भावासाठी अनेक वेळा आंदोलने करावी लागली़ पण वर्षभरात दुध पावडर निर्यातीचे धोरण केंद्र सरकारने चांगले ठेवल्याने दुध पावडरला व पर्यायाने दुधाला मागणी वाढली़ त्यामुळे दुधाचे भाव सव्वीस रूपये लिटरपर्यंत गेले आहेत. दूध उत्पादकांमध्ये मोठी वाढ झाली आहे़
-रामचंद्र मांडगे,
संचालक, दुध केंद्र