म्हारी छोरीया छोरोंसे कम है के?
By Admin | Updated: April 5, 2017 12:58 IST2017-04-05T12:58:23+5:302017-04-05T12:58:23+5:30
कुस्त्यांच्या आखाड्यात आता मुलीही दंड थोपटून मैदान मारत आहेत. कोणी भावाकडून, तर कोणी वडिलांकडून कुस्तीच्या डावपेचांचा अभ्यास करून ‘हम किसीसे कम नही,’ असा नारा देत आहेत.

म्हारी छोरीया छोरोंसे कम है के?
आॅनलाईन लोकमत
योगेश गुंड / अहमदनगर, दि़ ४ -
गावोगावी होणाऱ्या जत्रेत रंगत आणणाऱ्या कुस्त्यांचा हगामा आता फक्त पैलवानकी करणाऱ्या मुलांची मक्तेदारी राहिला नाही. नुकत्याच आलेल्या ‘दंगल’ चित्रपटामुळे अन् त्यातील ‘म्हारी छोरीया छोरोंसे क्या कम है’’? या डॉयलॉगमुळे तर सारा माहोल बदलून गेला आहे. कुस्त्यांच्या आखाड्यात आता मुलीही दंड थोपटून मैदान मारत आहेत. कोणी भावाकडून, तर कोणी वडिलांकडून कुस्तीच्या डावपेचांचा अभ्यास करून ‘हम किसीसे कम नही,’ असा नारा देत आहेत.
कुस्ती म्हटले, की मुलांची मक्तेदारी मानली जाते. पण आता ही मक्तेदारी इतिहास जमा होत आहे. कारण सध्या गावोगावी रंगणाऱ्या कुस्त्यांच्या हगाम्यात मुलीही दंड थोपटून कुस्त्या खेळून ‘दंगल’ चित्रपटाचा प्रभाव ग्रामीण भागातील मुलींच्या मनावर किती खोलवर झाला आहे, याची प्रचिती देत आहे. नगर तालुक्यात जत्रा झाली, की दुसऱ्या दिवशी गावात कुस्त्यांचा आखाडा भरतो. आता या आखाड्यात मुलांबरोबरच मुलीही कुस्ती खेळण्यासाठी लाल मातीच्या मैदानात उतरत आहेत.सारोळा कासार येथील जत्रेच्या हगाम्यात ६ मुलींनी कुस्त्या खेळून गर्दीला अचंबित केले.मुलीसुद्धा मुलांप्रमाणे कुस्तींचे मैदान गाजवू शकतात, यावर क्षणभर कोणाचा विश्वासही बसत नव्हता.इतर गावांतील कुस्तीच्या हगाम्यातही मुली कुस्ती खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.पैलवानकी करणाऱ्या मुलांना लागणारा खुराक आता मुलींसाठी बनवला जात आहे.
सारोळा कासार येथील प्रज्ञा सुखदेव साळवे हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली.तिचा भाऊ बुद्धभूषण पैलवान आहे.त्यानेच आपल्या बहिणीला कुस्तीमधील डावपेच शिकून कुस्तीसाठी तयार केले. प्रज्ञाने शालेय कुस्ती स्पर्धेचे मैदानही गाजवले आहे. ती नगर तालुक्यात प्रथम आली. आठवीत असल्यापासून ती कुस्तीचे धडे गिरवत आहे.रोज आपल्या भावासोबत ती कुस्तीचा सराव करत आहे.याच गावातील आदिती राजू धामणे ही नववीमध्ये शिकत असून, तिलाही आपला भाऊ आदित्य हा कुस्तीचे डावपेच शिकवत आहे.वडील शेतकरी आहेत.आदितीला कुस्तीत नावलौकिक मिळवायचा आहे.चिचोंडी पाटील येथील धनश्री इंगळे व ऋतुजा इंगळे या दोन्ही बहिणी शाळा शिकून आपले वडील सुनील इंगळे यांच्याकडून कुस्ती शिकत आहेत.गेल्या चार वर्षांपासून या दोघी बहिणी गावोगावी होणाऱ्या हगाम्यात सहभागी होऊन कुस्त्यांचे मैदान गाजवत आहेत. मोठी बहीण कोमलसुद्धा राज्यपातळीवर कुस्ती खेळली आहे.आता धनश्री व ऋतुजा यांनीही कुस्तीत करिअर करायचे आहे.
प्रज्ञाने शालेय कुस्ती स्पर्धेचे मैदानही गाजवले आहे. ती नगर तालुक्यात प्रथम आली. आठवीत असल्यापासून ती कुस्तीचे धडे गिरवत आहे.रोज आपल्या भावासोबत ती कुस्तीचा सराव करत आहे.याच गावातील आदिती राजू धामणे ही नववीमध्ये शिकत असून, तिलाही आपला भाऊ आदित्य हा कुस्तीचे डावपेच शिकवत आहे. वडील शेतकरी आहेत.