जिल्हा परिषद सदस्यांना लागले निवडणुकीचे वेध
By Admin | Updated: May 23, 2016 01:16 IST2016-05-23T00:20:27+5:302016-05-23T01:16:30+5:30
अहमदनगर : अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना वेध लागले आहेत.

जिल्हा परिषद सदस्यांना लागले निवडणुकीचे वेध
अहमदनगर : अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना वेध लागले आहेत. सध्या हे सदस्य आणि पदाधिकारी आपआपल्या गटात, मतदारसंघात अधिकाधिक निधी देण्यात आणि त्यांच्या विकास कामांच्या उद्घाटनात दंग असल्याचे चित्र आहे. तर पक्षीय पातळीवर पंचायत राज निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राजकीय शह काटशहाचा जिल्हा म्हणून राज्यात नगरकडे पाहले जाते. या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील राजकीय स्थिती वेगळी असून प्रत्येकाचे थेट मुंबईत वजन आहे. यामुळे निवडणूक कोणतीही असो, ती रंगतदार झाल्याशिवाय राहत नाही. पंचायत व्यवस्था हा तर राजकारणाचा पाया असल्याचे या ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगर जिल्हा परिषदेत सध्या ७५ गट आणि १५० गण अस्तित्वात आहे. या गट आणि गणाच्या रचनेचे काम अंतिम टप्प्यात असून यात गट आणि गणाची संख्या कमी होणार नसली तरी काही गावे एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्हा परिषदेत पाच पदाधिकारी यांच्यासह सदस्य आपल्या गटात अधिकाधिक कामे नेण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष करून रस्ते, बंधारे, शाळा खोल्यांना अधिक मागणी आहे. यासह तीर्थक्षेत्र विकासाची कामे करण्यावर सदस्यांचा भर आहे.
यासह मिळालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका जिल्हाभर सुरू आहे. जिल्हा परिषदेत सध्या सर्वाधिक कागदावर ३० सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. त्या खालोखाल काँग्रेस २८, सेना ६ आणि भाजपा ७, अपक्ष ३ आणि कम्युनिस्ट १ असे पक्षीय बलाबल आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजपात गेले असून यामुळे भाजपाची ताकद वाढलेली आहे.
पक्षीय आणि संघटनात्मक पातळीवर पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या बैठका आणि चाचपणी सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत पंचायत राज व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. युती आणि आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)
गेल्या पंचवार्षिकला झालेल्या निवडणुकामध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी पहिल्या नंबरवर होती. त्यावेळी ३० सदस्य निवडून आले होते. यंदा या जागा कायम राखण्यासोबत त्यात वाढ करण्याचा प्रयत्न राहणार आहे. या दृष्टीने आमदार दिलीप वळसे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने बैठका घेण्यात येणार आहेत.
-चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.
जिल्हा परिषदेत यंदा शिवसेनेची ताकद निश्चित वाढणार आहे. जिल्हा भर शिवसैनिकांचे मोठे जाळे तयार झाले आहे. याचा फायदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होणार आहे. यामुळे आतापासून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यात पक्षाला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. -प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना (दक्षिण).
जिल्हा परिषदेत सध्या सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस अस्तित्वात आहे. पक्षाचे २८ सदस्य असून दक्षिण भागात पक्षाला चांगले यश मिळाले होते. गेल्या पंचवार्षिकचे यश टिकवण्यासोबत यंदा त्यात मोठी वाढ होणार आहे. पंचायत राज निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसचाच झेंडा राहणार आहे.
-जयंत ससाणे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा भाजपा सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहे. जि.प.वर झेंडा फडकवण्यासाठी यातून किमान ४० जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोल्हे, राजळे, मुरकुटे, भांगरे, पाचपुते, वाकचौरे यांच्यामुळे भाजपा मजबूत झालेली आहे. या नेत्यांचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
-प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप.