लॉकडाऊनमुळे खरबूज उत्पादक शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST2021-05-01T04:20:05+5:302021-05-01T04:20:05+5:30
दहिगावने : कोरोनाचा फटका जवळपास सर्वच व्यवसायांना बसला आहे. यातून शेती व्यवसायहीदेखील सुटू शकलेला नाही. लॉकडाऊनमुळे फळ विक्रीला चांगलाच ...

लॉकडाऊनमुळे खरबूज उत्पादक शेतकरी हतबल
दहिगावने : कोरोनाचा फटका जवळपास सर्वच व्यवसायांना बसला आहे. यातून शेती व्यवसायहीदेखील सुटू शकलेला नाही. लॉकडाऊनमुळे फळ विक्रीला चांगलाच ब्रेक लागला आहे. सध्या खरबूज उत्पादक मोठ्या कष्टाने पिकविलेल्या फळाला भाव मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. विक्रीतून उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
उन्हाळ्यात खरबूज, टरबूज या पिकांना मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी मोठ्या आशेने या पिकांची लागवड करतात. फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेली पिके एप्रिलमध्ये तयार झाली. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आठवडे बाजार तसेच बाजार समितीत नेऊन विकता येत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. साधारणत: ४० रुपये प्रतिकिलो भाव असणारे खरबूज सध्या १० ते १२ रुपये किलो या मातीमोल भावाने द्यावी लागत आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात भाजीपाला तसेच खरबूज, टरबूज आदींची खरेदी करून व्यापारी शहरात दामदुप्पट दराने विक्री करत आहेत.
शेवगाव तालुक्यातील घेवरी येथील सोमनाथ पांडुरंग राऊत या तरुण शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात ५ एकर क्षेत्रावर कुंदन जातीच्या खरबुजाची लागवड केली होती. शेतीची मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके फवारणी, खुरपणी, पाणी देणे, काढणी व वाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागला. खरबूज तयार झाल्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या मोठ्या शहरांत विकण्याचा त्यांचा मानस होता. परंतु, कोरोनामुळे या आशेवर पुरते पाणी फिरले.
पिकविलेल्या मालाचा किमान उत्पादन खर्च तरी पदरी पडावा म्हणून त्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांस विकावा लागल्याने मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
-----
खर्चही परवडेना...
खरबुजाची तोडणी करण्यासाठी ८ ते १० मजूर लागतात. सध्या महिला मजुराला २०० रुपये तर पुरुषांना ४०० रुपये रोजंदारी आहे. तर बियाणे, खते खरेदी, कीटकनाशक फवारणी, खुरपणी, मशागत आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र सध्या कवडीमोल भावाने खरबूज, टरबूज आदींची विक्री करावी लागत असल्याने किमान उत्पादन खर्चही मिळत नसल्याची व्यथा सोमनाथ राऊत या शेतकऱ्याने मांडली.
----
३० दहिगावने
घेवरी येथील कलिंगड उत्पादक शेतकरी सोमनाथ राऊत.