गाव पुढाऱ्यांच्या सोशल मीडियावर जोर बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:58+5:302021-01-08T05:04:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढती स्पष्ट झाल्याने गावोगावचे राजकारण तापू लागले आहे. त्यात सोशल मीडियावरील प्रचाराने ...

गाव पुढाऱ्यांच्या सोशल मीडियावर जोर बैठका
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढती स्पष्ट झाल्याने गावोगावचे राजकारण तापू लागले आहे. त्यात सोशल मीडियावरील प्रचाराने भर घातली असून, प्रमुख उमेदवारांच्या फोटोसह प्रचारगीतांच्या क्लिपची सध्या सोशल मीडियावर धूम आहे.
गावोगावी सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. गावातील कार्यकर्ते यंदा आपलेच पॅनेल निवडून आणायचे, ही जिद्द समोर ठेवून कामाला लागले आहेत. मतदारांच्या गाठीभेटींवर उमेदवारांचा भर आहे. ग्रामीण भागातही मोबाईलची संख्या कमालीची वाढलेली असल्याने त्याचा वापर ग्रामपंचायतींच्या प्रचारासाठी केला जात आहे. काहींनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचे वेगवेगळे व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. तालुक्याच्या बड्या नेत्यांकडून मतदारांना सोशल मीडियाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. बड्या नेत्यांच्या फोटोसह उमेदवारांचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांकडून हे फोटो विविध ग्रुपवर व्हायरल होत असून, यामुळे साेशल मीडियावर ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगली आहे.
उमेदवारांच्या चिन्हासह याद्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. उमेदवारांना मिळालेल्या चिन्हावरून एकमेकांची खिल्ली उडविण्याचे प्रकारही सुरू आहेत. आपले चिन्ह अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभांना बंदी आहे. त्यामुळे एकमेकांवर जाहीर सभांमधून आरोप करता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर आरोप करण्यात येत असून, अनेक ग्रुपवर सध्या जुगलबंदी रंगली आहे.
...