‘कुकडी’ समितीची १ जुलैला बैठक

By Admin | Updated: June 28, 2014 01:12 IST2014-06-27T23:35:58+5:302014-06-28T01:12:17+5:30

श्रीगोंदा : चार आमदारांच्या मागणीनुसार १ जुलै रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. कोण कशासाठी रस्त्यावर बसणार आहेत हे मला माहीत नाही.

The meeting of the 'Kukadi' committee on July 1 | ‘कुकडी’ समितीची १ जुलैला बैठक

‘कुकडी’ समितीची १ जुलैला बैठक

श्रीगोंदा : चार आमदारांच्या मागणीनुसार १ जुलै रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. कोण कशासाठी रस्त्यावर बसणार आहेत हे मला माहीत नाही. ज्यांना गावातला सरपंच होता आले नाही, त्यांनी दुसऱ्यांना वेडे समजू नये, अशा शब्दात आ. बबनराव पापचुते यांनी घनश्याम शेलार यांचे नाव न घेता टीका केली़
पाचपुते म्हणाले, ३०-३५ वर्षात घोड कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलने केली़ संघर्ष केला़ सकारात्मक भूमिका मांडली़ दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलले़ तालुक्याचे वाळवंट केले असते तर सहा वेळा जनतेने आमदार केले असते का? काहींना स्वत:च्या गावचे सरपंच म्हणून लोकांनी स्वीकारले नाही, यावर त्यांनी प्रथम आत्मचिंतन करावे, असा सल्लाही पाचपुते यांनी दिला़
ते म्हणाले, भीमा नदीला कायम पाणी असते. भीमेच्या खोऱ्यात लवकर चांगला पाऊस होतो़ त्यामुळे या नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या लवकर काढल्या जातात. घोड नदीवरील परिस्थिती वेगळी आहे. पाऊस पडण्याची खात्री नसते़ त्यामुळे अनेकदा स्थानिक शेतकरी फळ्या काढण्यास विरोध करतात, ही वस्तुस्थिती आहे. पिंपळगाव जोगे धरणातील डेडस्टॉकमधून २ टीएमसी पाणी सोडले तर कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन देता येऊ शकते का, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. घोड नदीवरील बंधाऱ्यात पाणी नसल्याबाबत कार्यकारी अभियंत्याने सांगितले आहे, असेही पाचपुते यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)
काहींना माझी अ‍ॅलर्जी
कुकडी घोड पाटपाणी समितीने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीस मी लोकप्रतिनिधी नात्याने उपस्थित राहिलो. माझे मत मांडले. सर्वांचे ऐकून घेतले आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यावर सामूहिक लढा उभारण्याचा निर्णय झाला. यामध्ये कसले राजकारण! परंतु काहींना माझी अ‍ॅलर्जी आहे यापुढेही परमेश्वराने त्यांना अशीच बुद्धी देवो, असा टोमणा बबनराव पाचपुते यांनी शेलार यांना मारला.
कुकडीच्या पाण्यासाठी रास्तारोको करणारच
श्रीगोंदा : तेवीस जून रोजी केलेल्या धरणे आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. ३० जूनच्या रास्तारोको आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी आ. बबनराव पाचपुते यांनी १ जुलै रोजी कुकडी कालवा सल्लागार समिती बैठक बोलावली आहे़ मात्र, रास्तारोको आंदोलन करणारच, अशी माहिती राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांनी दिली.
कुकडी व घोड धरणातील पाणी साठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे. मग कुकडी धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या आवर्तन कसे चालू आहे. दि. २९ च्या बैठकीत मी अधिकाऱ्यांना ४५ मिनिटे डोक्यावर उभे केले असे, आ. पाचपुते सांगतात ! या बैठकीतून शेतकऱ्यांना काय फायदा मिळाला, घोड नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या निघाल्या का? घोड नदीवरील बंधाऱ्यात पाणी नाही असे कार्यकारी अभियंता यादवराव खताळ यांनी सांगितले आहे. यावर शेलार म्हणाले की, बंधाऱ्यातील पाण्याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी सोडले तर घोड लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगताना शेलार म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे कुकडी व घोडचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे बैठकीतून काय निष्पन्न झाले? फक्त लोकप्रतिनिधीचे भाषण ऐकून घ्यावे लागले, असा टोला शेलारांनी मारला. यावेळी सतीश जामदार, सादिक जामदार, बापू सिदनकर, संतोष रायकर, रवि भोसले आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The meeting of the 'Kukadi' committee on July 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.