वैद्यकीय तपासणीस देसाई यांचा नकार
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-02T23:57:55+5:302016-04-03T03:49:19+5:30
अहमदनगर : शिंगणापुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शिंगणापुरच्या बाहेर काढले.

वैद्यकीय तपासणीस देसाई यांचा नकार
अहमदनगर : शिंगणापुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शिंगणापुरच्या बाहेर काढले. त्यानंतर साडेतीन वाजता देसाई यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून वैद्यकीय तपासणीसाठी आणले. मात्र, कोणतीही तपासणी करण्यास देसाई यांनी नकार दिल्याने त्यांना नगरच्या हद्दीबाहेर पोलीस संरक्षणातून काढून देण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्या, अशी पोलिसांनी त्यांना विनंती केली. मात्र, ती विनंती त्यांनी धुडकावून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या दिला. त्यानंतर देसाई यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या महिला कार्यकर्त्यांची महिला पोलिसांनी उचलबांगडी करीत पोलीस व्हॅनमध्ये बसविले. सायंकाळी ५.१५ मिनिटांनी देसाई यांना रुग्णालयाच्या बाहेर व्हॅनमधून बाहेर काढण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मला मारहाण करण्यात आली. ही बाब गंभीर आहे. याबाबत मी राज्यपाल यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे भानुदास मुरकुटे यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)
मुरकुटे यांचा गडाख यांच्यावर आरोप
देसाई यांच्यासोबतच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची वैद्यकीय तपासणी केली. शिंगणापूर येथे त्यांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली. यावर रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. यावेळी मुरकुटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांनी घेतलेले नमते धोरण अजिबात पटले नाही. चौथऱ्यावरील दर्शन प्रकरणी ‘वाघाची बिल्ली’ झाली. त्यामुळेच नगरसेविका मंजुषा सिद्धार्थ मुरकुटे, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष व माजी सभापती सुनीता गायकवाड, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, अप्पासाहेब दुशिंग यांच्यासह १० महिलांना घेवून दर्शन घेण्यासाठी गेलो. महिलांना चौथऱ्यावर चढून दर्शन घेता आले पाहिजे, ही आमची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, तेथे दर्शन घेण्यास विरोध करून आम्हाला धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. पुरोगामी विचार केवळ भाषणांमध्ये मांडणारे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीच सुरक्षा रक्षकांमार्फत मारहाण केली. महिलेला अध्यक्षपदी बसवून महिलेमार्फत महिलांवरच अन्याय करण्याचे पाप गडाख करीत आहेत. या प्रकरणी शिंगणापुरच्या विश्वस्तांनी राजीनामे दिले पाहिजेत. दरम्यान, मुरकुटे यांना शिंगणापुरमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी मुरकुटे यांचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनीच आम्हाला संरक्षणात दर्शन दिले पाहिजे होते, असेही मुरकुटे यांनी स्पष्ट केले.
शिंगणापुरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिसांनी घेतली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणूनच देसाई यांना शिंगणापुरमध्ये ताब्यात घेतले. त्यांना नगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले. मात्र, त्यांनी तपासणीसाठी नकार दिला. देसाई यांना तसेच लोकांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, याची पोलिसांनी काळजी घेतली. मारहाण, धक्काबुक्की याबाबत त्यांना तक्रार द्यायची असेल तर ती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल.
-पंकज देशमुख,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक
शिंगणापूर देवस्थान आणि ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीने आणलेले गंगाजल चौथऱ्याखालूनच अर्पण करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे शिंगणापूर देवस्थान हे राज्यातील एकमेव देवस्थान आहे. महिला आणि पुरुष या समानतेसाठी गावाने दहा पावले मागे जाण्याचा निर्धार केला. यापूर्वी गुढीपाडव्याला पुरुष कावडीधारक चौथऱ्यावर जावून शनिदेवाच्या शिळेवर गंगाजल अर्पण करीत होते. मात्र भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणीही चौथऱ्यावर जात नाही़
-सयाराम बानकर, निमंत्रित सदस्य,
महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद