मुलाला वाचविण्यासाठी राजापूरच्या मायमाउलीची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:01+5:302021-07-15T04:16:01+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील मंगल शिवाजी लोखंडे या आपल्या एकुलत्या एक मुलाला स्वतःची किडनी देऊन जीवनदान ...

मुलाला वाचविण्यासाठी राजापूरच्या मायमाउलीची धडपड
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील मंगल शिवाजी लोखंडे या आपल्या एकुलत्या एक मुलाला स्वतःची किडनी देऊन जीवनदान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र किडनी प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या भल्यामोठ्या खर्चासाठी ही मायमाउली असाहाय्यपणे धडपड करत आहे.
राजापूर येथील भूमिहीन असणारे व पतीच्या पश्चात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे लोखंडे कुटुंब वास्तव्य करत आहे. मंगल लोखंडे यांचा एकुलता एक मुलगा देवेंद्र (वय २७) याच्या दोन्ही किडन्या दीड वर्षांपूर्वी निकामी झाल्या आहेत. तेव्हापासून हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी दवाखान्यामध्ये उपचार घेताना आठवड्यातून दोन वेळा डायलेसिस करावे लागत आहे.
मुलगा बरा व्हावा यासाठी आई आपल्या मुलाला एक किडनी देण्यास तयार आहे. तसेच किडनी प्रत्यारोपणाच्या सर्व चाचण्या झाल्या असून त्यांची एक किडनी देवेंद्र याच्या शरीरामध्ये प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी साडेपाच लाखांचा खर्च अपेक्षित असून २ ऑगस्ट तारीख दिलेली आहे.
यापूर्वी नातेवाईक व इतरांकडून कर्जरूपात घेतलेले २ लाख रुपयांहून अधिक खर्च देवेंद्रच्या उपचारात झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर तो पूर्ण बरा होईल, असा विश्वास डॉक्टरांनी आईला दिला आहे.
आई मंगल त्याच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी भटकंती करीत आहेत. कुठेतरी आशेचा दीप पेटेल, मुलगा बरा होईल, असा विश्वास तिला आहे. मुलाला जगविण्यासाठी आईची ही धडपड, तिच्या डोळ्यातून अहोरात्र पडणारे अश्रू पुसायला समाजातील दानशूर व सहहृदयींनी पुढे येऊन ‘गुगल पे ’, ‘फोन पे’ ला ९०११३०७५०३ या क्रमांकावर मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
140721\img-20210713-wa0023.jpg
देवेंद्र लोखंडे