जिल्ह्यात मातृवंदना योजना घराघरांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:22+5:302021-03-10T04:22:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. ...

जिल्ह्यात मातृवंदना योजना घराघरांत
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. या योजनेचे जिल्ह्यात समाधानकारक काम झाले असून, गेल्या पाच वर्षांत १ लाख २८८ मातांना तब्बल ४२ कोटी ५३ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यासाठी गेल्या पाच वर्षांत ९६ हजार ४०५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला होते. विभागाने १०४ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांच्या व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे, माता मृत्यू व बालमृत्युदरात घट होऊन ती नियंत्रित राहावी, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात लागू केली. महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१७ पासून ही योजना लागू करण्यात आली.
या योजनेनुसार पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपयांचे शासकीय अनुदान मिळते. नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत आरोग्य विभागाला ९६ हजार ४०५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आरोग्य विभागाने उत्कृष्ट काम करीत उद्दिष्टापेक्षाही जास्त म्हणजे १ लाख २८८ मातांना तब्बल ४२ कोटी ५३ लाख २५ हजार रुपयांचा लाभ दिला.
---------
वर्षनिहाय लाभ घेतलेल्या महिला
२०१६-१७ - २०५६
२०१७-१८ - १७९१३
२०१८-१९ - ३०१९८
२०१९-२० - ३१२६२
२०२०-२१ - १८८५९
एकूण - १००२८८
------------
शासनाची ही उपयुक्त योजना आहे. गरजू मातांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात याची नोंद करून लाभ घ्यावा. गेल्या पाच वर्षांचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी
-------------
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थ्याचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंद, शासकीय संस्थेत गरोदरकाळात तपासणी, बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण. उपरोक्त अटींची पूर्तता केल्यानंतर ३० दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा केली जाते.
पहिला टप्पा - एक हजार रुपये
दुसरा टप्पा -दोन हजार रुपये
तिसरा टप्पा - दोन हजार रुपये
--------
लाभासाठी यांच्याशी साधा संपर्क
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्याधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.
---------
फोटो - ०९मातृवंदना डमी १,२,३