नगरच्या साहित्यिकांची अन्य भाषांमध्येही मुशाफिरी
By Admin | Updated: February 26, 2016 23:33 IST2016-02-26T23:31:25+5:302016-02-26T23:33:38+5:30
अरुण वाघमोडे, अहमदनगर माझा मराठीचा बोलू कौतुकें, परि अमृतातेहि पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिकें मेळवीन अशी महती असलेल्या मराठी भाषा आणि साहित्याने केव्हाच प्रादेशिकतेची कक्षा ओलांडली आहे़

नगरच्या साहित्यिकांची अन्य भाषांमध्येही मुशाफिरी
अरुण वाघमोडे, अहमदनगर
माझा मराठीचा बोलू कौतुकें, परि अमृतातेहि पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिकें मेळवीन अशी महती असलेल्या मराठी भाषा आणि साहित्याने केव्हाच प्रादेशिकतेची कक्षा ओलांडली आहे़ मराठी भाषा व साहित्याला इतर भाषांमध्ये स्थान आणि सन्मान मिळवून देण्यात नगरच्या साहित्यिकांचाही हातभार आहे़
नगर येथील ज्येष्ठ कवी अरुण शेवते यांच्या ‘राजघाट’ या कविता संग्रहाचे मुंबई येथील प्राचार्या सुधा व्यास यांनी गुजरातीत भाषांतर केले़ तर त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘शर्वरीच्या कविता’ या काव्यसंग्रहातील आठ कवितांचे ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी हिंदीत अनुवाद केला़ येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या ‘अगस्त्य महात्म्य’या ओवीबद्ध पोथीचे डोंबिवली येथील श्रीकांत फाटक यांनी कन्नड भाषेत भाषांतर केले तसेच त्यांच्या ‘अगस्त्य’या कादंबरीचे पुणे येथील डॉ़ जोशी यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे़ त्यांच्याच ‘आव्हान’ या कवितासंग्रहाचे प्राचार्य डॉ़ अमरजा रेखी यांनी हिंदीत भाषांतर केले आहे़ येथील सेवानिवृत्त प्राध्यापक लछमन हर्दवाणी यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा सिंधी भाषेत अनुवाद केला आहे़ तसेच त्यांनी रामदास स्वामींच्या दासबोध, मनाचे श्लोक या ओवीबद्ध ग्रंथाचा सिंधीत अनुवाद केला आहे़ संत तुकारामांच्या तुकाराम गाथा या ग्रंथातील १५१ अभंगांचे व करुणाष्ठक या ग्रंथाचा त्यांनी सिंधीत अनुवाद केला आहे़ देवनागरी लिपीत त्यांनी हा अनुवाद केला आहे. विशेष म्हणजे हर्दवाणी यांनी या ग्रथांचे व अभंगांचे भाषांतर करून त्यांचे प्रकाशनही स्वत:च केले़ प्रकाशित केलेल्या या ग्रंथांचे सिंधी भाषकांना प्रतिंचे विनामूल्य वितरण केले़ मराठी भाषेतील या साहित्याचा इतर भाषांत अनुवाद हा मराठी भाषेचा सन्मानच आहे़
राज्य सरकारने यंदापासून सुरू केलेला ‘पहिला मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार’नगर येथील भाजीविक्रेत्या बेबीताई गायकवाड यांना जाहीर झाला. नगरकरांच्या दृष्टिने ही एक गौरवाची बाब आहे़