वाचन संस्कृती जपण्याचे मसापचे काम मोलाचे
By | Updated: December 6, 2020 04:22 IST2020-12-06T04:22:09+5:302020-12-06T04:22:09+5:30
अहमदनगर : हल्लीच्या स्मार्ट पिढीला सोशल मीडियामध्ये रस आहे. मात्र, पुस्तकाची पाने वाचताना जो आनंद मिळतो, तो हल्लीच्या बुकमार्कच्या ...

वाचन संस्कृती जपण्याचे मसापचे काम मोलाचे
अहमदनगर : हल्लीच्या स्मार्ट पिढीला सोशल मीडियामध्ये रस आहे. मात्र, पुस्तकाची पाने वाचताना जो आनंद मिळतो, तो हल्लीच्या बुकमार्कच्या वातावरणात मिळणार नाही. वाचन संस्कृती जपण्याचे, तिला समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा करीत आहे. ‘वारसा’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लेखक, कवी यांच्या प्रतिभेला साहित्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने वारसा दिवाळी अंकाचे प्रकाशन जगताप यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, जयंत येलूलकर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, मसापच्या सावेडी उपनगर शाखेने विविध साहित्यिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करीत अल्पावधीत साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. विभागीय साहित्य संमेलन, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले विद्यार्थी साहित्य संमेलन, मान्यवर साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव या उपक्रमांनी शहरात वाचनसंस्कृतील बळ दिले आहे.
अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले, जिल्ह्यातील साहित्यिकांच्या प्रतिभेला वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी म.सा.प.ची सावेडी उपनगर शाखा व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशील आहे. यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कोरोना विषाणू संसर्ग असतानाही साहित्य सेवेमध्ये कोणताही खंड पडू नये. याच विचारांनी वारसा दिवाळी अंकाची निर्मिती झाली आहे. या उपक्रमासाठी चित्रकार श्रीधर अंभोरे, किरण गवते, प्रशांत येमूल, प्रा. शशिकांत शिंदे, वैशाली मोहिते यांचे सहकार्य लाभले. म.सा.प. सावेडी शाखेचे प्रमुख कार्यवाह व अंकाचे कार्यकारी संपादक जयंत येलूलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाखेचे कार्याध्यक्ष भालचंद्र बालटे यांनी स्वागत केले. पदाधिकारी सुरेश चव्हाण यांनी आभार मानले.
---
फोटो -०५ येलूलकर
मसापच्या सावेडी शाखेतर्फे ‘वारसा’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, जयंत येलूलकर, भालचंद्र बालटे आदी.