अहमदनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक : संगमनेरात बस जाळली, अहमदनगर- औरंगाबाद महामार्ग ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 11:42 IST2018-07-24T11:42:01+5:302018-07-24T11:42:15+5:30
मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातही मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बस जाळण्यात आली आहे.

अहमदनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक : संगमनेरात बस जाळली, अहमदनगर- औरंगाबाद महामार्ग ठप्पच
अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातही मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बस जाळण्यात आली आहे.
काल मध्यरात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान टोल नाक्याजवळ ही बस जाळण्यात आली. नाशिकहून पंढरपूर कडे जाणारी बस प्रवाशांना खाली उतरवून पेटवण्यात आली.याबाबत अज्ञात ६ ते ७ जणांविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रात्री गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शेवगाव बंद यशस्वी करण्यात आला. नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राहुरी शहरातही १०० टक्के बंद यशस्वी करण्यात येत आहे. नेवासा, श्रीगोंदा, जामखेड, कोपरगाव, संगमनेर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी संप पुकारण्यात आला आहे. ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर - औरंगाबाद महामार्ग ठप्पच..
सोमवारी दुपारी चारनंतर काकासाहेब शिंदेच्या मृत्यूचे वृत्त पसरल्यानंतर वातावरण चिघळून अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील पुलावर रास्ता रोको सुरू करण्यात आला. ही वाहतूक अद्यापही सुरळित झाली नाही. त्यामुळे महामंडळाने पुणे-औरंगाबाद मार्गावरील बस बंद ठेवण्यात आल्या आहे. काल रात्रीदेखील या महामार्गावरील औरंगाबादकडे जाणारी वाहतूक बंद होती. या मार्गावरील वाहतूक शनिशिंगणापूर फाटा, कुकाणा, शेवगाव, पैठणमार्गे औरंगाबादकडे वळविण्यात आली आहे. प्रवरासंगम पुलावर सुमारे चारशे-पाचशे तरूणांचा जमाव ठिय्या देऊन होता. या रास्ता रोकोमुळे नगर- औरंगाबाद महामार्गावर दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली होती.