अनेकांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर
By Admin | Updated: August 17, 2014 23:25 IST2014-08-17T22:41:15+5:302014-08-17T23:25:43+5:30
अहमदनगर: लोकसभेची पुनर्वृत्ती विधानसभा निवडणुकीतही होईल, ही अपेक्षा ठेवून जिल्ह्यातील अनेक दिग्गज भाजपाच्या वाटेवर आहेत़

अनेकांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर
अहमदनगर: लोकसभेची पुनर्वृत्ती विधानसभा निवडणुकीतही होईल, ही अपेक्षा ठेवून जिल्ह्यातील अनेक दिग्गज भाजपाच्या वाटेवर आहेत़ केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी सोमवारी नगर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करण्याची अनेकांची सुप्त इच्छा आहे़ मात्र भाजपाने हा प्रवेश लांबणीवर टाकला आहे़ याविषयी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता काहींचा प्रवेशाचा निर्णय झाला असून, काहींबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही़ पक्ष प्रवेशाचा वेगळा कार्यक्रम घेऊन प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे़ त्यामुळे अनेकांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत़
लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे़ भाजपाच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ नियुक्ती नंतर शहा यांनी विधानसभा निवडणुकीची व्यहूरचना आखण्याचे काम हाती घेतले आहे़ पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी हा त्याचाच एक भाग आहे़ शहा यांनी नुकतीच भाजपाची कार्यकारिणी जाहीर केली़ या कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे़ भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नगर जिल्ह्यातील पक्षाचे प्रवक्ते श्याम जाजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्हा भाजपातही मोठी सफाई मोहीम होण्याची शक्यता आहे़ लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी सोमवारी नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत़ गडकरी यांच्या उपस्थित भाजपात अनेकजण भाजपात प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे़ याविषयीची राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षीय प्रवेशाचा स्पष्ट नकार केला आहे़ ते म्हणाले, आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे, गडकरी यांच्या कार्यक्रमात कुणीही पक्षात प्रवेश करणार नाही़ भाजपात प्रवेश करण्यासाठी जिल्ह्यातील अनेकजण इच्छुक आहेत़ काहींना प्रवेश देण्याबाबत निर्णय झाला असून, काहींची चर्चा सुरू आहे़ पक्षात नव्याने येणाऱ्यांच्या प्रवेशासाठीचा वेगळा कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)