कोपरगाव : शहरासह तालुक्यात गुरुवारी (दि.२५ ) एकाच दिवसात तब्बल १३३ बाधित रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, बाधित रुग्णाची संख्या ४८५ इतकी झाली असून, तालुक्यातील शहाजापूर येथील ६५ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी नगर येथील अहवालात ६९ , रेपिड अँटीजन किट तपासणीत ४०, खासगी लॅब अहवालात २४ असे एकूण तब्बल १३३ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत, त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा ४८५ वर गेला असून, दिवसागणिक होणारी रुग्णवाढ कोपरगावकरांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. ९६ व्यक्तींच्या घशातील स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे, तर ६९ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत ५० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.